मेहुण्यानं भावोजींच्या दोन कार चोरल्या; कारण ऐकून पोलिसांनी डोक्यावर हात मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 01:15 PM2021-11-14T13:15:14+5:302021-11-14T13:16:25+5:30
पोलिसांकडून दोन कार चोरणाऱ्या मेहुण्याला बेड्या
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये एक अजब घटना घडली आहे. वसुंधरा परिसरातील सेक्टर ३ मध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीच्या दोन कार त्याच्याच मेहुण्यानं चोरल्या. पोलिसांनी चोरट्या मेहुण्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडे कार चोरीबद्दल चौकशी केली. त्यावेळी त्यानं चोरीमागचं कारण सांगितलं. ते ऐकून पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला.
वरुण पाठक त्यांच्या कुटुंबासह गाझियाबादच्या सेक्टर तीनमध्ये वास्तव्यास आहेत. याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांची इको स्पोर्ट्स कार घराच्या पार्किंगमधून चोरीला गेली. इंदिरापुरम पोलीस ठाण्यात त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी एक पोलो कार खरेदी केली. अवघ्या काही आठवड्यांत ही कारदेखील चोरीला गेली.
दुसरी कार चोरीला गेल्यानंतर वरुण पाठक यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लागोपाठ दोन कार चोरीला गेल्यानं पोलिसांना वरुणच्या नातेवाईकांवर संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केला. वसुंधरा परिसरात एक तरुण चोरीची कार घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली.
पोलीस चौकशीत त्यानं स्वत:ची ओळख पुल्कित शर्मा सांगितली. पोलीस खाक्या दाखवताच पुल्कित पोपटासारखा बोलू लागला. फॉर्म्युला वनची आवड असल्यानं स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन कार चोरल्याचं त्यानं सांगितलं. दोन्ही कार विकून स्पोर्ट्स कार खरेदी करायची होती. त्यानंतर फॉर्म्युला वन शर्यतीत सहभागी व्हायचं होतं, असं पुल्कितनं पोलिसांना सांगितलं.