बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 08:11 PM2019-11-20T20:11:15+5:302019-11-20T20:18:27+5:30

कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.

Girl's drowning death or sabotage? | बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात?

बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात?

Next
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या शिरपूर वीटभट्टी येथील घटनामुलीच्या आईची अत्याचाराची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. डुकेश्वरी वसंत सहाणे असे मृत बालिकेचे नाव आहे. सोमवारी (दि.१८) नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. इकडे बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत बालिका डुकेश्वरी वसंत सहाणे ही मूळची छत्तीसगड राज्यातील इगतपुरी येथील राहणारी आहे. मोलमजूरी करणाऱ्या आईवडिलांसह गत सोमवारी कामठी तालुक्यातील शिरपूर येथील राजू जुगले यांच्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी सहाणे कुटुंब आले होते. आईवडील कामात असताना अडीच वर्षीय लहान भाऊ तोषण सोबत डुकेश्वरी खेळत होती. सोमवारी दुपारी १२ वाजता दरम्यान डुकेश्वरी आईकडे धावत जाऊन मातीचे बाहुले बनवून मागण्याची जिद्द करू लागली. यावेळी तिची आई कामात असल्याने ती खेळता खेळता दूर गेली. मात्र बराच वेळ होऊन ती परत न आल्याने आई लक्ष्मी व वडील वसंत यांनी तिचा शोध घेतला. बराच वेळ होऊन तिचा शोध न लागल्याने आईवडिलांची धाकधूक वाढली. यातच वीटभट्ट मालक राजू जुगले यांनी कदाचित नजीकच्या डबक्यात पडली असावी असा अंदाज व्यक्त केला. यानंतर वसंत यांनी येथील पाण्याच्या डबक्यात पाहणी केली असता डुकेश्वरीचा मृतदेह तिथे दिसून आला. यावेळी पोलीस कार्यवाही तसेच वैद्यकीय शवविच्छेदन प्रक्रिया टाळण्यासाठी राजू जुगले यांच्या सल्ल्यावरून बालिकेचा मृतदेह कंत्राटी जागेतील मोकळ्या जागेत पुरुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर या प्रकरणाची अधिक चर्चा होऊ नये म्हणून राजू जुगले यांनी मृत बालिकेच्या आईवडिलांना दहा हजार रुपयाची मदत देत त्यांच्या मूळ गावी जाण्यास सांगितले. यानंतर जुगले यांनी त्यांना इतवारी रेल्वे स्टेशनपर्यंत आणून दिले.

आई पुन्हा परतली...
वीटभट्टी मालकाने इतवारी रेल्वे स्थानकावर आणून दिल्यानंतर मृत बालिकेची आई लक्ष्मी यांना मुलीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे तिने पतीसह इतवारी येथून शांतिनगर पोलीस स्टेशन गाठले. मात्र या प्रकरणाचे घटनास्थळ कामठी पोलीस स्टेशन येत असल्याने ते सोमवारी रात्री कामठीत दाखल झाले. यानंतर त्यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांची भेट घेत झालेल्या प्रकार सांगत मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार नोंदविली.

पुरलेला मृतदेह बाहेर काढला 


मुलीच्या आईच्या तक्रारीची दखल घेत मंगळवारी नवीन कामठी पोलीस शिरपूर येथील घटनास्थळी दाखल झाले. तिथे दुपारी १२ वाजता पंचाच्या उपस्थितीत बालिकेचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे, पोलीस निरीक्षक संतोष बकाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाघमारे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्ता हैदरी यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयातील न्यायवैद्यकीय विभागात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

वीटभट्टी मालक आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद !
वीटभट्टी मालक राजू जुगले यांनी या प्रकरणाची बालिकेच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू न देण्याचा सल्ला दिला होता. असा सल्ला का देण्यात आला, याचा तपास होणे आवश्यक आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मात्र घटना होऊन दोन दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही पोलिसांनीही ही घटना का लपवून ठेवली, याबाबत परिसरात विविध चर्चा केल्या जात आहे. नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहेत.

Web Title: Girl's drowning death or sabotage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.