निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तब्बल ६१ तोळं सोनं चोरीला, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:18 PM2021-09-11T22:18:29+5:302021-09-11T22:20:34+5:30
Crime News :घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला.
फलटण - एक दोन नव्हे तर तब्बल ६१ तोळं सोन चोरीला गेल्याने फलटण तालुक्यातील कोळकी येथे प्रचंड खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त असलेल्या एका शिक्षिकेच्या घरात ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. बॅंकेतील लॉकरवर आमचा विश्वास नव्हता म्हणून घरातच सोनं ठेवलं, असं त्या सेवानिवृत्त शिक्षिका पोलिसांना सांगितलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहरानजीक कोळकी गावच्या हद्दीतील शारदानगर येथील कस्तुरा सीताराम माळी (वय ६३) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या घरामध्ये त्या आणि त्यांची बहीण राहत आहे.
दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले त्यांचे व त्यांची बहीण शकुंतला यांचे ६१ तोळे सहा ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे सर्व दागिने चोरून नेले. या दागिन्यांची किंमत तब्बल १४ लाख रुपये होती. दरम्यान, शनिवारी सकाळी त्या घरी आल्या असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी घटनास`थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली. तसेच सातारहून श्वानपथक मागविण्यात आले होते. फलटण शहर पोलीस स्टेशनचा मोठा पोलीस फौजफाटा तपासाच्या दृष्टीने विविध ठिकाणी शोध घेत आहे. या घटनेची फिर्याद कस्तुरा माळी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ हे करीत आहेत.