नेरळ - बँकेतून पैसे घेऊन बाहेर निघालेल्या ७० वर्षीय आजीचा पाठलाग करत एका अज्ञात व्यक्तीने तिच्या जवळील रोकड चोरून नेली आहे. त्या वृद्ध महिलेजवळ असणारी १ लाख ९ हजार रुपयांची रोकड या चोरट्याने हिसकावून महिलेला धक्का देत घटनास्थळाहुन धूम ठोकली. या धक्यात आजीच्या डोक्याच्या देखील मार लागला. याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात वृद्ध महिलेने धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ७० वर्षीय महिलेचे नाव सुनंदा मधुकर कोकाटे असे असून त्या नेरळ टेपआळी येथे राहणारे असल्याचे समजतंय. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कोकाटे या नेरळ बाजारपेठेत असलेल्या युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. सुरुवातीला आजी सोबत घरातील मंडळींनी नातवाला पाठवले होते. परंतु बँकेत उशीर झाल्याने नातू आजीला सोडून घरी परतला. तर आजीने आपल्या बँक खात्यातून एक लाख ९ हजार एवढी रक्कम घरकामासाठी लागणार असल्याचे सांगून बँक अधिकाऱ्याकडून ताब्यात मिळवली. घरी निघालेल्या आजीने बँकबाहेर पडताच पिशवीत गुंडाळलेली रोकड ही छातीशी घट्ट पकडून,आजीने रहदारीचा असलेला मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून जाणे टाळत नेरळ माथेरान रेल्वे स्थानकातील लोको शेड जवळील निर्जन रस्तावरून जाणे पसंत केले.
मात्र, आपल्या मागावर कुणी आहे याचा त्यांनी विचार देखील केला नव्हता. सुरुवातीपासून तोंडाला रुमाल बांधून आजीच्या मार्गस्थ असलेला चोर आजीच्या एकटेपणाचा फायदा घेत आजीला अर्ध्यारस्त्यात गाठून तिच्या जवळील रोकड हिसकावून तिला धक्का देखील दिला. या धक्यात आजीच्या डोक्याच्या देखील मार लागला होता. तर रोकड मिळताच घटनास्थळाहुन चोर फरार झाला. कोकाटे आजी व घरातील मंडळींनी नेरळ पोलीस ठाणे गाठून याबत नेरळ पोलिसांना माहिती दिली. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय बांगर व त्यांच्या पोलिस टीमने घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळावरील असलेले सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात सुरुवात केली आहे.