लातूर : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला विक्री ठिकाणावर अन्न व औषध प्रशासन आणि गांधी चौक पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून कारवाई केली आहे. यामध्ये ४५ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सूत्रांनी सांगितले, राज्य शासनाने गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू विक्रीला बंदी घातली आहे. मात्र काहीजण अवैधरित्या या साहित्याची विक्री करीत असल्याचे आढळून येत आहेत. मंगळवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांच्या साह्याने लातुरातील गंजगोलाई परिसरातील मे. तांबोळी पान मटेरियल येथे ठिकाणी तपासणी केली. यावेळी राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा गुटखा व पानमसाला विक्रीसाठी साठा केल्याचे आढळून आले. यामध्ये एकूण ४५ हजार ५१५ रुपयांचा साठा आढळून आला. तो पथकाने जप्त केला आहे.
याप्रकरणी साठा मालकाविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक आयुक्त तथा पदावधित अधिकारी डी.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे यांनी केली. त्यांना गांधी चौक पोलीस ठाण्याचे देवकते यांनी सहकार्य केले.