मुंडन वाद : मारहाणप्रकरणी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 09:38 PM2019-12-25T21:38:20+5:302019-12-25T21:39:53+5:30
भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०६, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - वडाळा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचे शिवसैनिकांनी मुंडन केले होते. हा संतापजनक प्रकार वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी आता वडाळा टी. टी. पोलिसांनीशिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि प्रकाश हसबे, श्रीकांत यादव यांच्यासह इतरांविरोधात भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०६, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये तक्रार दाखल करून कारवाई केली होती. मात्र, शिवसेना विरुद्ध भाजप असे राजकीय वातावरण तापले असून भाजपचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी हे मुंडन केलेल्या हिरामणी तिवारी यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात कारवाई करण्याबाबत येऊन गेले. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणाचा आढावा घेतला आणि शिवसैनिकांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण करण्यात आला. तिवारी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना शिवसैनिकांनी मारहाण करून त्यांच्या उजव्या कानाचा पडदा फाडून त्यांना दुखापत केली आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे नमूद केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला होता. तसेच भरचौकात त्याचे केस कापून मुंडन करण्यात आलं होतं. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी (३३) या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मात्र, त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी कायदाच हातात घेत तिवारी यांचे मुंडन केले.
ही घटना रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मुख्यमंत्र्यांची बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर टाकली म्हणून पोस्ट टाकणाऱ्या हिरामणी तिवारी यांच्या घरी शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर यांनी दोन इसमांनी पाठवून हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच मशीनने त्याचे केस कापून मुंडन केले. त्यावेळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले आणि दोन इसमांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांचे जबाब नोंद केले असता त्यांनी त्यांच्यात समजोता झाल्याचे सांगून एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तिवारी यांचा जबाब नोंद करून समाधान जुगदर आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.