मुंबई - हज यात्रेसाठी बुकींगचे पैसे घेऊन देखील त्यांना तिकीट न देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. सरफराज जैनुदिन जिवरत असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत २२ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंब्रा येथील रहिवासी चौगले मोहम्मद हुसेन यांनी आॅक्टोबरमध्येच सरफराजकडे हज यात्रेसाठी ६ तिकिटांची बुकींग केली. त्यासाठी त्यांनी २ लाख ८८ हजार रुपये दिले. ठरल्याप्रमाणे रविवारी ते निघाले. मात्र त्याच दिवशी सरफराजने यात्रेकरुंना व्हिसा दिला नाही. उडवाउडवीचे उत्तरे देत सरफराजने त्यांना टाळले. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.
या प्रकरणात सरफराजला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत त्याने आतापर्यंत २२ जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. त्यांनी त्यांचे पासपोर्ट त्यांना परत केल्याची माहिती दिली. तर काहींना त्याने बनावट तिकीट दिल्याचीही कबुली दिली.