पिशवीत आढळले महिलेचे अर्धवट धड; आरोपींचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 04:08 AM2019-12-09T04:08:31+5:302019-12-09T06:04:25+5:30
कल्याणमधील धक्कादायक प्रकार
कल्याण : प्लास्टीकच्या पिशवीत २० ते २५ वर्षीय महिलेचे अर्धवट धड रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर रविवारी पहाटे मिळाल्याने शहरात खळबळ उडाली. महात्मा फुले चौक पोलीस आरोपींचा शोध घेत असून, त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे.
पश्चिमेतील वल्लीपीर रोड परिसरात असलेल्या रिक्षास्टँडजवळ रविवारी सकाळी ५.२५च्या सुमारास ४० ते ४५ वयोगटांतील एक पुरुष आला. त्याने तेथे उपस्थित असलेल्या रिक्षाचालकाला भिवंडी येथील गोवा नाका येथे नेण्यास सांगितले. त्याचदरम्यान, रिक्षाचालकाला त्याच्याकडे असलेल्या पिशवीतून उग्र दर्प येऊ लागला. रिक्षाचालकाला संशय आल्याने त्याने हटकले असता, तो पिशवी तेथेच टाकून पळून गेला. त्यानंतर, रिक्षाचालकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पिशवी उघडून पाहिली असता त्यात एका महिलेचे अर्धवट धड होते. या पिशवीत २० ते २५ वयोगटांतील महिलेचा कमरेपासून खालचा भाग होता. महात्मा फुले चौक पोलिसांनी हा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात तपासणीसाठी पाठविला आहे.
घटनास्थळाजवळील, तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले. या फुटेजमध्ये कल्याण रेल्वे स्थानकातून लाल रंगाचे शर्ट घातलेला संशयित आरोपी पळताना दिसत आहे. त्याच्याजवळ एक काळ्या रंगाची बॅगदेखील दिसून येत आहे. पळणारी व्यक्तीच काळ्या रंगाची बॅग घेऊन आल्याची, तसेच तिच्यासोबत अन्य एक ते दोन व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली. ही महिला कोण आहे, तिची हत्या का करण्यात आली, तिचे उर्वरित शरीर कुठे आहे, हत्या करणारे कोण आहेत, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
भिवंडीत जाण्याचे कारण काय?
२० ते २५ वर्षीय महिलेची हत्या करून, आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा कमरेखालील भाग कोणत्या तरी धारदार हत्याराने कापून तो काळ्या रंगाच्या पिशवीत भरला. त्यानंतर, ती पिशवी एका पांढºया रंगाच्या प्लास्टीक पिशवीत भरून ती आणखी एका पांढºया रंगाच्या प्लास्टीक गोणीत भरली.
ती प्लास्टीकची गोणी एका चॉकलेटी रंगाच्या ट्रॅव्हलिंग बॅगेत भरून आरोपी भिवंडीतील गोवा नाका येथे जाण्याच्या बेतात होता. गोवा नाका येथे जाऊन आरोपी काय करणार होता, तिथे त्याला आणखी कोणी भेटणार होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तूर्तास तरी अनुत्तरित आहेत.