टपरीत अमली पदार्थ विकणाऱ्याची माहिती देणाऱ्या तरुणाचा माेडला हात, विक्रेत्याचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:32 AM2021-04-03T02:32:46+5:302021-04-03T02:33:08+5:30
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या आरोपीची पुराव्यासह माहिती देणाऱ्या तरुणाला आरोपीने मारहाण करून हात मोडल्याची घटना घडली आहे.
नालासोपारा : माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या आरोपीची पुराव्यासह माहिती देणाऱ्या तरुणाला आरोपीने मारहाण करून हात मोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तक्रारदारास पिटाळून लावल्याची घटना घडली आहे.
वसईच्या प्रेमनगर चाळीतील एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका टपरीत जनरल स्टोअर्सच्या नावाखाली असगर अली अहमद अन्सारी उर्फ राजू हा गावठी, विदेशी दारू, बीयर यांची बेकायदा विनापरवाना विक्री करतो. या गैरकृत्याविरोधात मोहम्मद अली अहमद अन्सारी या तरुणाने माणिकपूर पोलिसांना माहिती देऊन कारवाईची मागणी केली होती. बेकायदा दारूविक्रीचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाला होता. ६ मार्चला याबाबतचा व्हिडीओसह माहिती पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना सादर केली होती. तरीही पोलिसांनी योग्य कारवाई न करता आरोपीविरोधात अमली पदार्थ विक्री करत असल्याचा गुन्हा दाखल न करता गांजा सेवन करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी कारवाई न करता आरोपीबरोबर आर्थिक तडजोड केल्याचा आरोप तक्रारदाराने नव्याने केलेल्या तक्रार निवेदनात केला आहे.
२४ मार्चला रात्री ११ वाजता असगरअली हा गांजाविक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. याबाबतच्या पुराव्यासाठी मोबाइलवर शूटिंग करीत असताना आरोपीने जमीला अहमद अन्सारी, अली अहमद अन्सारी यांच्यासह तरुणाला जबर मारहाण केली. यात त्याचा डावा खांदा, हाताला दुखापत झाली आहे. मात्र माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. त्यात फक्त असगरअली याचेच नाव नमूद असून गांजा विक्रीबाबत कुठलाच उल्लेख केलेला नाही.
दरम्यान, याबाबतचे व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग पुरावे म्हणून पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले आहेत. सहायक पोलीस आयुक्त गिरिधर यांना १० दिवसांत चाैकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत. माणिकपूर पोलीस तडजोड करत असल्याने त्याच्यावर कारवाई हाेत नसल्याचे मारहाण झालेल्या मोहम्मद अन्सारी याचे म्हणणे आहे. यावर पाेलीस आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.