फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करून संपत्ती जमवणाऱ्या आरोपींना बेड्या; राजकीय वरदहस्त असल्याचा संशय  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 04:43 PM2021-05-29T16:43:58+5:302021-05-29T16:56:12+5:30

Crime News : लता पवार आणि पंकज भोसले यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे तर इतर आरोपी पोलीस कोठडीत आहेत

Handcuffs to the accused who amassed wealth by collecting haftas from hawkers; Suspected of being a political benefactor | फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करून संपत्ती जमवणाऱ्या आरोपींना बेड्या; राजकीय वरदहस्त असल्याचा संशय  

फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करून संपत्ती जमवणाऱ्या आरोपींना बेड्या; राजकीय वरदहस्त असल्याचा संशय  

Next
ठळक मुद्देपोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात दोन आरोपींकडून वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची लेटरहेड सापडली आहेत.

मुंबईतल्या रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी आणि हप्तावसुली करून अमाप संपत्ती जमवलेल्या एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या इतर साथीदारांना दादर लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोषकुमार रामप्रताप सिंग उर्फ बबलू ठाकूर असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या पत्नीसह एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. बबलू ठाकूर याच्यावर मुंबई शहरात गंभीर स्वरूपाचे एकूण २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच या आरोपींपैकी एक आरोपी समीर लालझरे याला मुलुंडमधून बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींना कोणत्या राजकीय पक्षाचा वरदहस्त आहे का?, असा संशय पोलिसांना येत आहे. एकंदरीत या प्रकरणात दीपाली कामटे, समीर लालझरे, संजय मोहिते, बबलूची पत्नी रिटा सिंग आणि लता पवार उर्फ आयेशा अमीर शेख आणि पंकज भोसले यांना अटक केली आहे. यापैकी लता पवार आणि पंकज भोसले यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे तर इतर आरोपी पोलीस कोठडीत आहेत, अशी माहिती दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

त्यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात दोन आरोपींकडून वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची लेटरहेड सापडली आहेत. संबंधित आरोपी खरोखरच पक्षाशी संबंधित आहेत का? याचा तपास सुरू आहे. कारण यापैकी एका आरोपीने कोर्टात मनसे पक्षात असल्याचा उल्लेख केला होता. दरम्यान, २० मे रोजी संजय मोहिते याने वंचित बहुजन माथाडीच्या लेटरहेडचा वापर करून रेल्वे आयुक्तांना पत्र लिहिले. या पत्रात त्याने “पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे तो गुन्हा मागे घ्या, अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करू”, असा इशारा मोहितेने पत्राद्वारे दिला होता. या पत्रात त्याचं पद वंचित बहुजन माथाडीचा जनरल सेक्रेटरी असल्याचं लिहिलं होतं. या संजय मोहितेला आज दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली. 

मुख्य आरोपी बबलू ठाकूर याची आतापर्यंत 3 करोड पेक्षा जास्त संपत्ती आढळून आली आहे. ज्यामध्ये त्याच्या पत्नीच्या नावावर जवळपास ९ घरे आणि अमाप सोने खरेदी केल्याचे स्पष्ट झालं असल्याचं काटकर यांनी सांगितले. हे फक्त खंडणीचे प्रकरण नसून आणखी गंभीर प्रकरण असल्याचे उघडकीस येईल, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मुख्य आरोपीच्या पत्नीचा पळून जाण्याचा डाव फसला

तपासादरम्यान मुख्य आरोपी बबलू ठाकूर याची पत्नी रिटा सिंग हिला अटक करून दादर रेल्वे पोलीस ठाण्यात असता तीने लेडी कॉन्स्टेबलच्या हाताला झटका दिला. त्यानंतर रेल्वेसमोर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एपीआय अर्जुन घनवट यांनी जीवाची बाजी लावून रेल्वेसमोर उडी मारून आरोपी महिलेला वाचवलं. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाच कौतुकही केलं जातं आहे.

Web Title: Handcuffs to the accused who amassed wealth by collecting haftas from hawkers; Suspected of being a political benefactor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.