नवी दिल्ली - चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. हातचलाखी करून गंडा घालणाऱ्या, लुटणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या काही मिनिटांत लाखो रुपये लंपास करणाऱ्या या लोकांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असलेला पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना हरियाणामध्ये पाहायला मिळाली आहे. 11 वर्षीय मुलाने थेट बँकेतच डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या 36 सेकंदात त्याने तब्बल 20 लाख लंपास केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील पंजाब नॅशनल बँकेत ही चोरीची घटना घडली. बँकेत मास्क लावून आलेल्या एका 11 वर्षीय मुलाने 36 सेकंदात 20 लाखांवर डल्ला मारला आहे. ही संपूर्ण घटना ही बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बँकेच्या मॅनेजरनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी कॅशिअर वॉशरूममध्ये गेला होता. त्याचवेळी केबिनमध्ये कोणीही नाही याचा फायदा घेऊन मुलगा केबिनमध्ये शिरला. तेथील पैसे आपल्या बॅगेत टाकून त्याने गुपचूप पळ काढला.
अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास
केबिनचं दार ओपन असल्याने 11 वर्षांच्या मुलाने अवघ्या काही सेकंदात तब्बल 20 लाख रुपये लंपास केले. मुलगा लहान असल्याने कोणाचेही याकडे लक्ष गेले नाही. तसेच त्यावेळी पटकन चोरी झाल्याचं लक्षात आलं नाही. दुपारच्या वेळेस हा संपूर्ण प्रकार घडला. मात्र संध्याकाळी जेव्हा कॅश मोजली गेली तेव्हा त्यामध्ये 20 लाख रुपये कमी असल्याचे समजले. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी चोरीचा हा धक्कादायक प्रकार पाहून सर्वच जण हैराण झाले आहेत.
बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली चोरी
मास्क लावून मुलगा बँकेत आला होता. चोरी झाली त्यावेळी अनेक जण बँकेत उपस्थित होते. मात्र तो लहान असल्याने कोणीही त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. याचाच फायदा घेत मुलाने संधी साधली आणि बँकेत डल्ला मारला आहे. मुलाने अत्यंत शिताफीने पैसे लंपास केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. बँकेत चोरी झाल्याचं लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मुलाचा शोध घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.