Hathras Gangrape : नातेवाईकांना नाही दिला मृतदेह, धरणे आंदोलनावर बसले वडील अन् भाऊ
By पूनम अपराज | Published: September 29, 2020 07:08 PM2020-09-29T19:08:13+5:302020-09-29T19:10:01+5:30
आम्हाला कोणताही पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला नाही. आम्ही कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नाही. आमच्या परवानगीशिवाय हॉस्पिटल मृतदेह कसा घेऊ जाऊ शकतो असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे वडील व भाऊ सफदरजंग रुग्णालयात धरणे आंदोलनावर बसले आहेत. आमच्या परवानगीशिवाय मृतदेह दवाखान्यातून नेण्यात आला असा आरोप त्यांनी केला. आम्हाला कोणताही पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला नाही. आम्ही कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नाही. आमच्या परवानगीशिवाय हॉस्पिटल मृतदेह कसा घेऊ जाऊ शकतो असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पीडितेच्या भावाने सांगितले की, वडिलांनी रुग्णवाहिका चालकाशी बोलणं केलं आहे. रुग्णवाहिका यमुना एक्स्प्रेसवे पुढे गेली आहे. वडिलांनी ड्रायव्हरला परत येऊन पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवायला सांगितले आहे. जर हे सर्व घडले नाही तर हाथरसातील मृतदेह कोणीही स्वीकारणार नाही.
चंद्रशेखर आझाद यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले
त्याचवेळी भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सोमवारी रात्री डॉक्टरांनी व्हेंटिलेटरचे प्लग काढून टाकले होते, सरकारची पीडितेचा मृत्यू व्हावा अशी सरकारची इच्छा होती ती दलित समाजातील होती. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, पीडित मुलीच्या पालकांसह येथे कोणताही पोलिस कर्मचारी नव्हता.
सीआरपीएफ रुग्णालयात तैनात
चंद्रशेखर आझाद आज पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात गेले होते. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी सकाळी हाथरस घटनेतील पीडितेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेवर राजकीय गदारोळ सुरू आहे.
कुटुंब म्हणाले - एडीजी खोटे बोलत आहे
एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांच्या वक्तव्यावर पीडितेच्या कुटूंबाने प्रतिक्रिया दिली आहे. एडीजी खोटे बोलत असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. पीडित मुलीने आपले 22 सप्टेंबर रोजी पहिले स्टेटमेंट दिले होते आणि सामूहिक बलात्काराबद्दल माहिती दिली होती. यापूर्वी कोणालाही माहिती नव्हते की तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे, कारण ती बेशुद्ध होती.
एडीजी काय म्हणाले?
आज तकशी बोलताना एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, ही घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता घडली. त्यानंतर, मुलगी आपल्या भावासोबत पोलिस स्टेशनला आली आणि गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मुलीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब एससी / एसटी कायद्याशी संबंधित होती, म्हणून याप्रकरणाची चौकशी क्षेत्राधिकारी स्तरावरील अधिकारी यांच्याकडे देण्यात देण्यात आली.
पोलिसांच्या डोळ्यात तरळले अश्रू, जिभेचा तुकडा पडूनही पीडितेने नराधमांविरोधात जबाब देण्याचा केला प्रयत्न https://t.co/OEUq0mVOdf
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2020