- मंगेश कराळेनालासोपारा - नवीन घर घेण्याची इच्छा मैत्रिणीला बोलून दाखवली व तिनेच गैरफायदा घेत प्रियकर अल्पवयीन मित्रासोबत मिळून तिच्याच घरात लाखोंची घरफोडी केली. आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौशल्याने तपास करून दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.
एव्हरशाईन सिटीतील रश्मी गार्डन इमारतीमध्ये राहणाऱ्या दिव्या पटेल (३५) या महिलेच्या घरी ७ ते १३ नोव्हेंबर दरम्यान तिजोरीत असलेले ८ लाख ३६ हजाराची रोख रक्कम व ४ तोळे सोन्याचे दागिने असे ९ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता. आचोळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटना स्थळावरील तसेच आजूबाजूचे परिसरातील १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले. तरी गुन्ह्यातील आरोपीबाबत काहीही थांगपत्ता लागला नाही. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून बिल्डींगमधील लोकांकडे तसेच दिव्या यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी आरोपी तरुणी हर्षिता गुप्ता (२३) हिला नवीन घर खरेदी करणार असल्याचे बोलल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी तरुणीकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर दरवेळी विसंगती माहिती देत असल्याने तिच्यावर संशय बळावल्याने ताब्यात घेऊन अधिक तपास केला. तरुणी आणि तिचा अल्पवयीन प्रियकर या दोघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला आयफोन, के टी एम दुचाकी, फर्निचर, फ्रीज अश्या महागड्या वस्तू तसेच ४ लाख ३० हजारांची रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी तरुणीला अटक करून वसई न्यायालयात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपीला भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.- चंद्रकांत सरोदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे)