मुंबई : कांदिवलीत घडलेल्या वकील हरीश भांबनी तसेच आर्टीस्ट हेमा उपाध्याय यांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी कारागृहात असलेला तिचा पती चिंतन उपाध्यायने कोरोना पार्श्वभूमीवर जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. कारागृहाबाहेर पडल्यावर तो पुरावे मिटवण्याची शक्यता असल्याचा दावा करत वकील आणि पोलिसांनी दिंडोशी सत्र न्यायालयात याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यानुसार याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.चिंतनच्या जामीन अर्जावर ३१ आॅगस्ट, २०२० रोजी त्याची सुनावणी झाली. त्यात तपास करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ७ आणि बार असोसिएशनच्या वकिलांनी न्यायालयात सोमवारी आक्षेप नोंदवला. हेमा उपाध्यायचे वकील हरीश भांबानी यांनी कोर्टात तिची बाजू पाहिली होती त्यारागात त्यांची हत्या करवली असे वकिलांचे म्हणणे आहे.त्याला जामीन मंजूर झाला तर बाहेर पडून याप्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती न लागलेल्या आरोपीसोबत मिळून पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पोलीस महानिरीक्षक ( कारागृह ) दिपक पांडे यांनीही कारागृहातील कैदी योग्य स्थितीत आहेत असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. यामुळे चिंतनला जामीन मंजूर करण्यात येऊ नये असे न्यायालयाला बार कौन्सिलचे सदस्य अॅड़ केदार सयानी यांनी सांगितले. याप्रकरणाची सुनावणी ३ सप्टेंबर,२०२० रोजी होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.कांदिवलीच्या पोईसर नाल्यात हेमा आणि हरीश या दोघांचे १२ डिसेंबर, २०१५ रोजी मृतदेह बॉक्समध्ये पॅकिंग अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. यात ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवत जवळपास २ हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले होते.निर्णयाकडे लक्षयातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण वर्षभरात आटोपण्यास सांगितले होते. मात्र चिंतन काही न काही कारण सांगत हे प्रकरण पुढे ढकलत होता. सत्र न्यायालय चिंतनबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुख्य आरोपीसोबत 'तो' पुरावे मिटवेल ! चिंतन उपाध्यायच्या जामिनाला पोलिसांचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 4:28 AM