पहलू खान विरोधातील गोतस्करीचा गुन्हा रद्द करण्याचे हायकोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:51 PM2019-10-30T21:51:12+5:302019-10-30T21:54:07+5:30
राजस्थान हायकोर्टाने बुधवारी राजस्थान पोलिसांना दिले आहेत.
राजस्थान - कथित गोरक्षकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पहलू खान, त्यांची दोन मुले आणि वाहनचालक यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गायींच्यातस्करीचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने बुधवारी राजस्थान पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे खान कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता. यावेळी पेहलू खान यांनी हुकूम चंद, नवीन शर्मा, जगमल यादव, ओम प्रकाश, सुधीर आणि राहुल सैनी यांनी हल्ला केल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता पोलिसांनी या सहा जणांना क्लीन चीट दिली होती.
ऑगस्ट महिन्यात कनिष्ठ कोर्टाने पहलू खान हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यामध्ये काही अल्पवयीन आरोपींचा समावेश होता. मात्र, कोर्टाच्या या निर्णयावर पहलू खानच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करीत वरिष्ठ कोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी हायकोर्टात अपिल दाखल केले होते.
दरम्यान, पोलिसांनी आरोपपत्रात पहलू खान आणि त्यांच्या दोन मुलांना बेकायदा गायींची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी बनवले होते. एप्रिल २०१७ मध्ये राजस्थानातील अलवर येथे कथित गोरक्षकांनी पहलू खान यांच्यावर हल्ला केला होता. राजस्थानातून गायी खरेदी करुन ते टेम्पोने हरयाणाकडे निघाले होते. डेअरीचा व्यवसाय करणाऱ्या पहलू खान यांना कथीत गोरक्षकांनी गायींची तस्करी करण्याच्या संशयातून बेदम मारहाण केली होती, त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.
Pehlu Khan case: Rajasthan High Court has ordered to dismiss the FIR and charge-sheet against Pehlu Khan, his two sons and the driver of the vehicle. pic.twitter.com/pXOrfsvjj3
— ANI (@ANI) October 30, 2019