नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या नवजात बाळाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेवारसरित्या सोडून दिल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हिमाचल प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सरकारी निवासस्थान 'ओकओवर'जवळ हे नवजात बालक बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचं सुरक्षा रक्षकांने पाहिलं. तपास केल्यानंतर एका महिलेचं हे बाळ असल्याचं समोर आलं. या महिलेला पकडण्यात काही तासांतच पोलिसांना यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ सापडलेल्या नवजात बालकाच्या आईचा शोध काही तासांतच लावण्यात आला. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतलं. रस्त्यावर सापडलेल्या रक्ताच्या ठशांवरून पोलीस या महिलेपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले. शनिवारी संबंधित महिलेनं कमला नेहरू रुग्णालयाजवळ (KNH) आपल्या नवजात बालकाला बेवारस अवस्थेत सोडून दिलं होतं. हे स्थान मुख्यमंत्री निवासस्थानाच्या अगदी जवळ असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या काही सदस्यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि याबद्दल तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
छोटा शिमला पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी लगेचच बाळाला ताब्यात घेत उपचारासाठी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज - रुग्णालयात दाखल केलं. बाळाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर पुढच्या पाच तासांच्या आतच पोलीस या बाळाच्या आईचा शोध घेण्यात यशस्वी ठरले. महिलेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 317 (12 वर्षांहून कमी वयाच्या बाळाचा परित्याग करणं) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी अधिकारी रंजना शर्मा दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला केएनएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. उपचारानंतर तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशात कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटने थैमान घातले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लसचं खोटं कारण सांगून एका पतीने आपल्य़ा पत्नीचा जीव घेतला आहे. पाच दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. एसव्हीआआर या सरकारी रुग्णालयाच्या शेजारी जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह हैदराबादमधील एका 27 वर्षीय तरुणीचा आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यामध्ये महिलेचा पती मुख्य संशयित असून हत्या करुन तो फरार झाल्याचा अंदाज आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणंही अशक्य होतं. मात्र पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीने सुटकेस टाकण्यासाठी मदत घेतलेल्या टॅक्सीचा शोध घेतला आणि या भयंकर प्रकरणाचा उलगडा केला आहे.