मुंबई : मनसुख हिरेन हे पाण्यात पडले त्यावेळी काही वेळ जिवंत होते. त्यांच्या फुप्फुसात खाडीचे पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली. (Hiren died after water from the creek went into his lungs)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. स्फोटक प्रकरण समोर येताच अवघ्या काही दिवसांत मनसुख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मनसुख हे पाण्यात पडले त्यावेळी काही वेळ जिवंत होते. त्यांच्या फुप्फुसात खाडीचे पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली. हा अहवाल एटीएसकडे साेपवण्यात आल्याचे समजते.
त्याआधी मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी समोर आलेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या फुप्फुसात जास्त पाणी आढळून आलेले नाही, अशी माहिती तपासाअंती समाेर आली होती.
पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास फुफ्फुसात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय कायम आहे.