होर्डिंग दुर्घटना प्रकरण : जाहिरात कंपनीच्या मालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 05:59 AM2018-10-12T05:59:09+5:302018-10-12T05:59:41+5:30
होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना ते कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कॅप्शन अॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्घ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना ते कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कॅप्शन अॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्घ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल रज्जाक महंमद खालीद फकिह (वय ५४, रा. अर्जुन मनसुखानी पथ, कोरेगाव रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या जाहिरात कंपनीच्या मालकाचे नाव आहे. कॅप्शनकडून परवान्याची मुदत संपल्याने कोसळलेल्या होर्डिंगसह परिसरातील इतर तीन होर्डिंग काढण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांना १३ डिसेंबर २०१७ रोजी पत्र दिले होते. पण रेल्वेकडून त्यांना परवानगी देण्यात आली नाही. ठेकेदारामार्फत हे होर्डिंग काढले जाईल, असे रेल्वेकडून जाहिरात कंपनीला सांगण्यात आले होते. या प्रकरणात यापूर्वी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय ४२, रा. विकासनगर, देहूरोड) आणि त्याचा सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे (वय ५७, रा. कसबा पेठ) यांन ६ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर ठेकेदार मल्लिकार्जुन व त्याच्या कामगारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी किरण राजाराम जाधव (वय ३६, रा. मुंढवा रोड, घोरपडी गाव) यांनी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत शाम राजाराम धोत्रे (वय ४५, रा. जनता वसाहत, पर्वती), शामराव गंगाधर कसार (वय ७०, रा. पिंपळे गुरव), शिवाजी देविदास परदेशी (वय ४०, रा. २९१, नाना पेठ) आणि जावेद मिसबाउद्दीन खान (वय ४५, रा. स्पाइन रोड, चिखली) यांचा मृत्यू झाला होता. तर १० जण जखमी झाले आहेत.
तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
या प्रकरणी दाखल केलेल्या फियार्दीत लोखंडी होर्डिंगचा साचा कापणारे कामगार व ठेकेदार यांनी स्थानिक प्रशासन व पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच परवानगी न घेता सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही. यामुळे साचा पडून नागरिक मृत व जखमी झाल्याचे म्हटले आहे.
संबंधीत गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा व अजामीनपात्र असून सत्र न्यायालयात चालणारा आहे. तसेच अटक आरोपींकडून फरार आरोपींची माहिती व ठावठिकाणा काढावयाचा आहे. गॅस कटर व मशिन जप्त करावयाचे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एम. एम. काळवीट यांनी केली होती. मात्र प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी टी. एम. निराळे यांनी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
कोसळलेले होर्डिंग अनधिकृत असून ते धोकादायक असल्याचे पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने रेल्वे प्रशासनाला २०१३ पासून वेळोवळी पत्र पाठवून कळवले होते. मात्र, रेल्वेकडून त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. होर्डिंग खूपच कमकूवत झाल्यावर रेल्वे प्रशासनाने ते पाडण्याचे काम हाती घेतले होते.
होर्डिंग गॅस कटरच्या साह्याने खालच्या बाजूने कापत असताना ते सिग्नलवर थांबलेल्या सहा रिक्षा, एक कार व दोन दुचाकींवर पडले. धक्कादायक बाब म्हणजे होर्डिंग इतरत्र पडू नये म्हणून त्यांना अगदी किरकोळ दोऱ्यांनी बांधण्यात आले होते.
या संदर्भात घटनेच्या दिवशी रात्री उशिरा रेल्वे प्रशासन व ठेकेदाराविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विष्णुदेवसिंग आणि वनारे यांना अटक करण्यात आली होती.