पिंपरी : एटीएममध्ये पैसे काढणारी व्यक्ती तेथेच पाकिट विसरून गेली. सुदैवाने ते पाकिट पोलिसाच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला आणि रोकड असलेले पाकिट परत करून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले.
सुनील प्रल्हाद शेटे (रा. काळेपडळ, हडपसर) हे गुरुवारी (दि. 24) दापोडी येथील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी त्यांचे पाकिट एटीएममध्ये काढून ठेवले. पैसे काढून झाल्यानंतर पाकिट तेथेच विसरले. शेटे एटीएममधून निघाल्यानंतर पोलीस नाइक दिनेश साबळे हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता तेथे पाकिट दिसून आले. त्यात दोन हजारांची रोकड, वाहन चालविण्याचा बॅच तसेच परवाना, पॅन कार्ड आणि ओळखपत्रे होती. त्यामुळे पाकिट सुनील शेटे यांचे असल्याचे समोर आले. परंतू त्यांचा सविस्तर पत्ता नव्हता. त्यामुळे पाकिट परत कसे करायचे, असा प्रश्न होता.
पोलीस नाइक साबळे यांनी सहकारी पोलीस कर्मचारी निवास रोकडे व ज्ञानेश्वर भुरे यांची मदत घेतली. एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-याचे व्हिजिटिंग कार्ड पाकिटात मिळून आले. त्यावरील संपर्क क्रमांकावर फोन केला आणि सुनील शेटे यांच्याशी संपर्क साधता आला. खात्री करून शेटे यांना त्यांचे पाकिट, त्यातील रोकड, पॅनकार्ड व ओळखपत्रे आदी परत केले.
कोरोना योद्धा म्हणून पोलीस काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडले. मी विसलेलो माझे पाकिट परत मिळाल्याने मला या खाकीतील प्रामाणिकपणाची प्रचिती आली, असे शेटे यांनी सांगितले.