"मी तोंड उघडलं तर..."; 18 आमदार, 3 मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या 'तिने' दिला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 03:30 PM2022-12-09T15:30:10+5:302022-12-09T15:34:41+5:30
मुख्य आरोपी अर्चना नागने केलेल्या दाव्याने राजकारणातील अनेक मंडळींची झोप उडाली आहे.
ओडिशामध्ये हनीट्रॅपमुळे सुरू झालेला वाद आता थांबताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीच ओडिशातील चित्रपट निर्माता अक्षय परीजा याने एका जोडप्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा दावा केला. या जोडप्याने ओडिशातील नेत्यांना, मंत्र्यांना आणि इतर मोठ्या अधिकाऱ्यांना फसवलं आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हनीट्रॅप प्रकरणातील आरोपी अर्चनाने मी तोंड उघडलं तर ओडिशामध्ये सगळं काही बदलेलं, असा धमकीवजा इशारा दिला आहे.
हनीट्रॅपमुळे ओडिशाच्या राजकारणात वादळ आणणाऱ्या जोडप्याची चौकशी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुरू केली आहे. मुख्य आरोपी अर्चना नागने केलेल्या दाव्याने राजकारणातील अनेक मंडळींची झोप उडाली आहे. मला चुकीच्या पद्धतीने अडकण्यात आलं आहे. मी तोंड उघडलं तर राज्यात मोठं परिवर्तन होईल, असा सूचक इशारा तिने दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 आमदार, 3 मंत्री, अनेक मोठे अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींना अर्चना नागने जाळ्यात ओढलं.
अर्चनाने ओडिशा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ओडिशा पोलिसांनी मला चुकीच्या पद्धतीनं पोलीस ठाण्यात 60 तासांहून अधिक वेळ ताब्यात ठेवलं. या; दरम्यान माझा मानसिक छळ केला. माझ्या वृद्ध आई वडिलांना भेटायची परवानगीदेखील दिली नाही, असे आरोप अर्चना नागने केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ओडिशाच्या बोलांगीरमध्ये राहणारी अर्चना 2015 मध्ये भुवनेश्वरला पोहोचली. तिने इंटिग्रेटेड लॉ कोर्ससाठी प्रवेश घेतला. 2017 मध्ये अर्चनाची भेट बालासोर जिल्ह्यातील 33 वर्षांच्या जगबंधू चंदशी झाली. 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. यानंतर जगबंधूनं वेगळाच उद्योग सुरू केला. तो अर्चनाच्या मदतीने श्रीमंतांना हनीट्रॅप करायचा आणि ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
जगबंधू त्याच्या संभाव्य सावजांना स्वत:ची ओळख एका प्रमुख राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून करून द्यायचा. त्यामुळे श्रीमंत उद्योगपती, मंत्री, खासदार, चित्रपट निर्माते यांच्याशी त्याच्या ओळखी झाल्या. दोघे श्रीमंत व्यक्तींना आपल्या घरी बोलवायचे. त्यांना जेवणाचं निमंत्रण द्यायचे. चांगली ओळख झाल्यावर दोघे त्या व्यक्तीला जाळ्यात अडकवायचे. त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करायचे. बेडरुममध्ये त्यासाठी त्यांनी स्पाय कॅमेरा लावला होता. पुढे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळायचे. अर्चनाने अनेकांना आपल्या जाळ्यात फसवलं. चित्रपट निर्माता अक्षय परीजियालादेखील तिने गळाला लावण्याचा प्रयत्न केला.