नागपुरातील अंबाझरी ले-आऊटमध्ये आढळले हुक्का पार्लर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:27 AM2020-01-31T00:27:05+5:302020-01-31T00:29:02+5:30
गुन्हे शाखा पोलिसांनी अंबाझरी ले-आऊटमध्ये दिवसाढवळ्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी अंबाझरी ले-आऊटमध्ये दिवसाढवळ्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. पोलिसांना हॉटेल तनवीरजवळील मिम्स हुक्का पार्लरमध्ये हुक्का दिल्या जात असल्याची माहिती मिळाली. दुपारची वेळ असल्यामुळे पोलिसांना विद्यार्थी सापडतील असा विश्वास होता. परंतु आत प्रवेश केल्यानंतर ग्राहक मिळाले नाहीत. पार्लरची तपासणी केली असता तंबाखू फ्लेवरचा हुक्का सापडला.
कारवाईत पोलिसांनी हुक्क्याच्या सामानासह ७५८० रुपयांचे साहित्य जप्त केले. तेथे पार्लरचा व्यवस्थापक भरत रमेश नागोसे रा. पांढराबोडी हा होता. त्याने पार्लरचा मालक मोहसीन खान असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसीन अनेक दिवसांपासून हुक्का पार्लर चालवितो. त्याने पोलिसांच्या विरुद्ध न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे त्याच्या पार्लरवर कारवाईची हिंमत कुणी करीत नव्हते. सामाजिक सुरक्षा शाखेने योजना आखून हुक्का पार्लरवर धाड टाकली. अंबाझरी आणि बजाजनगर ठाण्याच्या परिसरात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. येथे हर्बलच्या आड प्रतिबंधित हुक्का दिला जातो. त्यांना पोलिसांचा आश्रय आहे. हुक्का पार्लरबाबत अंबाझरी, सीताबर्डी, सदर सर्वाधिक चर्चेत आहे. येथे रात्री उशिरापर्यंत हुक्का पार्लर सुरु राहतात. माऊंट रोडवरील एक हुक्का पार्लर पहाटेपर्यंत सुरु असते. येथे तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना दिसतात. परंतु पोलीस कारवाई करीत नाहीत. २५ जानेवारीला रात्री अंबाझरीच्या शंकरनगर चौकाजवळ वाईब्स कॅफे आणि रेस्ट्रोत धाड टाकण्यात आली. १५ पेक्षा अधिक युवक-युवती हुक्का पिताना आढळल्या. पोलिसांनी व्यवस्थापक अमित इंगळे, मालक शब्बीर बलाकत शेख, पप्पु डागोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. २०१७ पासून हे हुक्का पार्लर चालविण्यात येते. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावरही अंबाझरी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी कारवाई करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक सुरक्षा शाखेशी संपर्क साधून कारवाई करण्याची मागणी केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर पार्वते, अतुल इंगोले, सुभाष खेडकर, मनोज सिंह चव्हाण, प्रवीण फांदडे, मुकुंदा घारमोडे, प्रफुल बोंदरे, दीपिका दानोडे, सीमा बघेल यांनी केली.