डोंबिवली - कल्याण डोंबिवलीत गेल्या अनेक दिवसांपासून विजचोरीचे प्रकार समोर येत आहेत. एका प्रसिद्ध कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी एका एजन्सीनं लाखो रुपयांची वीजचोरी केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीत पुन्हा एका हॉटेल चालकाने चक्क 7 लाख 59 हजरांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उर्मी हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी हॉटेल चालक पुनीत शहा याच्याविरुद्ध कल्याण (पश्चिम) येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत फडके रोडवरील लक्ष्मी बाग इस्टेट येथील उर्मी हॉटेलच्या (वीज बिलावरील नाव स्प्लेंडर शेल्टर प्रा. लि.) मीटरची तपासणी करण्यात आली. मीटरचा डिस्प्ले नादुरुस्त झाल्याचे व मीटरशी छेडछाड केल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे हे संशयित मीटर ताब्यात घेऊन ग्राहकासमक्ष महावितरणच्या कार्यालयात अधिक तपासणी करण्यात आली. यात अतिरिक्त सर्किटच्या माध्यमातून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. सहायक अभियंता योगिता कर्पे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल चालक पुनीत शहा याच्या विरुद्ध वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रज्जाक शेख या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यात हॉटेल चालकाने चोरी केलेल्या विजेचे 7 लाख 59 हजार रुपयांचे बिल भरले आहे व दंडाच्या आकारणीची मागणी केली आहे.
अबब.... हॉटेल चालकाने केली तब्बल "इतक्या" रुपयांची वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 9:26 PM