मुंबई - सहा दिवसांपूर्वी अंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखविंदीरसिंग हरबन्ससिंग दुग्गल हे त्यांच्या कुटुंबियांसह बँकॉक येथे विवाहनिमित्त गेले असताना त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराने मित्राच्या मदतीने घरातील ६२ लाखांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्याची ३ पथके नवी दिल्ली, बिहार आणि नेपाळ याठिकाणी तपासकामी पाठविण्यात आली होती. आरोपींचे मोबाईल बंद असून देखील विशेषतः कोणतीही अधिक माहिती नसताना आरोपींना चंदीगड येथून अटक केली असल्याची माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच नोकराने चोरलेली ६२ लाखांची सर्व मालमत्ता हस्तगत केल्याचे पुढे सांगितले.
अटक आरोपींची नावं संजीव रे (२४) आणि अनिल रे (३१) अशी असून त्यांनी संगनमत करून सुखविंदीरसिंग यांच्या घरातील सोन्या - चांदीचे आणि डायमंडचे दागिने, महागडी मनगटी घड्याळे , परफ्यूम्स आणि दोन लॅपटॉप असा ऐकून ६२ लाख ४६४९ रुपयांचा ऐवज घेऊन पाळ्या केले होते. जेव्हा चोरांनी हा ऐवज चोरी केला तेव्हापासून त्यांनी स्वतःचा मोबाईल फोन बंद ठेवला होता. जेणेकरून पोलिसांना आरोपींचे टॉवर लोकेशन कळू नये. अशा परिस्थिती आरोपीच्या नावाशिवाय काहीही माहिती असताना देखील पोलिसांनी शिताफीने चंदीगड येथील कुराली आणि मोहाली या ठिकाणी ३ दिवस मुक्काम ठोकून गोपनीय माहिती काढून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी या ठिकाणी लपून बसले होते असून त्यांच्याकडून चोरी केलेली २ लॅपटॉप, ८० विविध प्रकारचे सोन्या - हिऱ्यांचे दागिने, १६ महागडी मनगटी घड्याळे, ७ महागडे परफ्यूम्स, ६ महागडे टाय आणि ८० ते ९० प्रकारची महागडी आर्टिफिशियल ज्वेलरी अशी मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटक आरोपी संजीव रे आणि अनिल रे यांना न्यायालायने २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.