ठळक मुद्देवाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : सिगारेट उधार मागितली, दुकानदाराने नकार दिला. त्यामुळे रागाने जात एकाने दुकानदाराच्या घरात शिरून साहित्याची तोडफोड केली. तसेच हातात तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याने घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडत बोरगेवाडी, पुनावळे येथे दहशत माजविली. ही घटना सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी सागर भरत बोरगे (वय २८) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बोरगे यांनी फिर्याद दिली आहे. सुधीर शिवाजी लिंबकर या प्रमुख आरोपीसह अमित पाटोळे, योगेश धुमाळ, टिंकू मिश्रा, तुकाराम व एक अनोळखी इसम (रा. पुनावळे, ओव्हाळवस्ती ) यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची सविस्त माहिती अशी, सागर बोरगे यांचे बोरगेवाडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. रात्री दहाच्या सुमारास सुधीर लिंबकर दुकानात येऊन सिगारेट उधार मागू लागले. दुकानदार सागर यांनी त्यांना सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडुन आरोपी लिंबकर याने दुकानदारास शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता रात्री पावणेबाराच्या सुमारास सागर यांच्या घरी येऊन आरोपीने त्यांच्या दरवाजावर लाथा मारल्या. खिडकीच्या काचा फोडल्या. दरवाजा उघडून पाहिले तर सुधीर हातात तलवार घेऊन उभा होता. तूला आता जिवंत सोडणार नाही, असे धमकावले. घरात शिरून घरातील साहित्याचे नुकसान केले. घरातील साडेचार हजार रुपए घेतले. त्याचवेळी आरोपी सुधीर याचे साथीदार अमित पाटोळे, योगेश धुमाळ, टिंकू मिश्रा, तुकाराम आणि आणखी एक साथीदार हातात तलवारी घेऊन परिसरात आले. दुकानदार सागर यांच्या घराजवळील मोटारीच्या काचा फोडल्या. रागाच्या भरात केवळ दुकानदाराच्या मोटारीचेच नव्हे तर त्या ठिकाणी उभ्या केलेल्या दोन दुचाकी आणि एका टेम्पोचे नुकसान केले. यामध्ये परवेझ शेख यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. परिसरात दहशत माजवुन टोळके तीन दुचाकीवरून पळून गेले.