मुंबई - काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकावर अतिशय दुर्दैवी असा अपघात घडला. या अपघातात दोन चिमुकल्यांसमोरच लोकलखाली येऊन आईचा दोन तुकडे होऊन मृत्यू झाला आहे. विरार जलद लोकलखाली येऊन प्रीती राजेश गुप्ता (वय - २५) या महिलेचा मृत्यू झाला. या लोकलमधील प्रवाश्यांनी देखील हळहळ व्यक्त करत त्यांना देखील अश्रू आवरले नाहीत. याबाबत वांद्रे रेल्वे पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद असून किरकोळ जखमी झालेल्या दोन चिमुरड्यांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी दिली.
काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चर्चगेटहून विरारला जाणारी जलद लोकल वांद्रे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर येत असताना चर्चगेटच्या दिशेने हा अपघात झाला. मात्र, रुळ ओलांडताना की लोकल पकडत असताना हा अपघात झाला हे अजून निष्पन्न झालेले नाही असे जाधव यांनी सांगितले. याच लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिला प्रवाश्याने या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, अशी घटना माझ्यासाठी पहिल्यांदाच होती. मनाला वेदना देणारी घटना होती. लोकल अतिशय वेगाने दादरहून सुटली होती. मात्र, वांद्रे स्थानक येणार म्हणून थोडा वेग कमी झाला असताना आरडाओरडा ऐकू आला. कोणीतरी लोकलची साखळी घेऊन लोकल थांबवली. महिलांचा डब्ब्यातील अनेक बायका डोकावून अपघात पाहत होत्या. अपघातात महिलेचे दोन तुकडे आणि डोह फोडणारी दोन चिमुकली मुलं पाहून बायका हळव्या होऊन ओक्साबोक्शी रडत होत्या. तर काही महिला एकमेकींना धीर देत होत्या असे तिने पुढे सांगितले.
वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी मयत प्रीती राजेश गुप्ता हि महिला बोरिवली येथील राहणारी असून ती हरवल्याबाबत काल कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार तिच्या पतीने दाखल केली होती. अपघातात दोन चिमुरडी मूळ सुदैवाने किरकोळ जखमी झाली आहेत. अंदाजे एक २ आणि दुसरा ४ वर्षांचा मुलगा आहे. मोठ्या मुलाच्या तोंडाला आणि चेहऱ्याला मार लागला असून लहान मुलाच्या कपाळाला, चेहऱ्याला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळाला असून लवकरच त्यांना संपर्क साधू. त्यानंतर ती घर सोडून का निघाली? घरी भांडण झालं होतं का ? या प्रश्नांची उकल होईल असे जाधव यांनी सांगितले.