नवी दिल्ली – २ महिन्यापूर्वी ८ ऑगस्टला दिल्ली पोलिसांकडे एक तक्रार आली होती. उत्तर दिल्लीच्या एका शाळेतील मुलींना आणि शिक्षकांना कुणी ऑनलाईन त्रास देत होता. व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज आणि सोशल मीडियावर मॉर्फ्ड केलेले फोटो पाठवत होता. आंतरराष्ट्रीय नंबरवरुन येणाऱ्या कॉल्सनं सगळेच त्रस्त झाले होते. ऑनलाईन क्लासमध्ये एडमिनच्या परवानगीशिवाय तो प्रवेश करायचा. पीडितांच्या तक्रारीवरुन पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला.
हा तपास सुरु असताना यामागे १९ वर्षीय मुलाचा हात असल्याचं उघड झालं. महावीर कुमार असं या मुलाचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महावीर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(IIT) खडगपूर येथे पदवीचं शिक्षण घेत होता. महावीरनं ५० हून अधिक शिक्षिका आणि मुलींना निशाणा बनवलं होतं. शाळेत शिकणाऱ्या मुलीसोबत महावीरचा ऑनलाईन संपर्क झाला. दोघांमध्ये मैत्री झाली. महावीर त्या मुलीला खूप पसंत करत होता. त्यानंतर महावीरनं इन्स्टावरुन फेक आयडी बनवत त्या मुलीशी संपर्क साधला. महावीरनं त्या मुलीला अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करू लागला. त्याने मुलीकडून शिक्षकांचे नंबर्स घेतले आणि ऑनलाईन क्लासमध्ये वेबलिंक्स शेअर करू लागला.
ऑनलाईन क्लासवेळी महावीर ग्रुपमध्ये अश्लील कन्टेंट शेअर करत होता. शाळेने मुलांची करकूत असल्याचं समजत काही विद्यार्थ्यांवर कारवाई केली. परंतु तरीही हा प्रकार थांबला नसल्याने शाळेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकाराचा शोध घेण्यासाठी IP एड्रेस तपासला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडित मुली, शिक्षिका आणि पालक यांच्याशी संपर्क साधून ५ फेक इन्स्टाग्राम अकाऊंट, फेक कॉलर आयडी आणि ३३ व्हॉट्सअप नंबर शोधले. आयपी एड्रेसचा शोध घेतल्यानंतर आरोपी महावीरची ओळख पटली.
डीसीपी यांनी सांगितले की, मोबाईल नंबर्स तपासला असता एका नंबरवर पीडितेला तीन वर्षापूर्वी कॉल आला होता. त्या नंबरवर बनलेल्या प्रोफाईल्समधून मुलीची निवड झाली. पटना येथे अटक केलेल्या आरोपी महावीरनं चौकशीत गुन्हा कबूल केला आहे. महावीरनं ओळख लपवण्यासाठी कॉलवर आवाज बदलणाऱ्या एप्सचा वापर केला होता. एप्सच्या माध्यमातून पीडितांचे फोटो न्यूड करत मॉर्फ करत होता. महावीरच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडीओ आणि फोटो आढळले. महावीरनं कुठल्याही प्रकारची वसुली केली नाही. हे सर्वकाही मज्जेसाठी केल्याचा दावा महावीरनं केला. महावीरचा सोशल मीडिया चेक केला तर त्याने युजर्सचा फोन नंबर जाणून घेण्यासाठी अनेकदा ब्लॅकमेलिंगचा वापर केला. यात कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यवहार झाला नाही. मला एक मुलगी आवडत होती. परंतु त्यानंतर त्याने आणखी मुलींचा शोध घेण्यासाठी इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.