२४ तासांत लष्कराने घेतला बदला, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:28 PM2022-05-13T21:28:19+5:302022-05-13T21:34:17+5:30
Encounters Breaks Out : काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते.
जम्मू काश्मीर : काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी त्यांची पत्नी मीनाक्षी हिला दोन दिवसांत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आश्वासन दिले होते. लष्कराने २४ तासांत आपले वचन पूर्ण केले. त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी बांदीपोरामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यामध्ये मारले गेलेले दोन दहशतवादी राहुल भट्टच्या हत्येत सामील होते. तिसरा दहशतवादी गुलजार अहमद असून त्याची ओळख 11 मे रोजी झाली होती. बडगाम जिल्ह्यातील चदूरा तहसीलदार कार्यालयामध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राहुल भट्ट यांची गुरुवारी कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती आहे.
पाकिस्तानातून दोन दहशतवादी घुसले होते
काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते. बांदीपोरा येथे सुरक्षा दलांची त्यांच्याशी चकमक झाली. 11 मे रोजी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान दोघेही पळून गेले आणि सालिंदर जंगल परिसरात लपले.
काल काश्मिरी पंडिताची तर आज पोलीस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या, २४ तासांत दुसरी घटना
लेफ्टनंट गव्हर्नरांनीही आश्वासन पूर्ण केले
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी काही तासांपूर्वी ट्विट करून राहुल भट्ट यांच्या नातेवाईकांची भेट घेतल्याचे सांगितले होते. मी भट्ट यांच्या कुटुंबाला न्याय दिला. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना या गुन्ह्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
राहुलच्या ऑफिसमधील काही लोकांवर संशय
राहुल भट्ट यांची पत्नी मीनाक्षी हिने आज तकला सांगितले की, तिचे पतीशी १० मिनिटांपूर्वीच बोलणे झाले होते. लवकर या वाढदिवसाला जाऊ असं ती म्हणाली होती. त्यावर राहूल यांनी ठीक आहे असं म्हटलं, त्यानंतर मला कळले की, दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. तिने सांगितले की, पतीच्या कार्यालयात काम करणाऱ्या काही लोकांवर तिला संशय आहे की ते दहशतवाद्यांसोबत पतीची हत्या करण्याच्या कटात सामील आहेत.
दहशतवादी हालचालींबाबत सतर्कता
Aaj Tak ला मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलांना अलर्ट जारी केला होता. 10 मे रोजी बांदीपोरा भागात तीन अज्ञात दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यात आल्याचे अलर्टमध्ये म्हटले आहे. हे दहशतवादी सतत त्यांचे ठिकाण बदलत होते. हे दहशतवादी सुरक्षा दल, सुरक्षा दलांची वाहने आणि पिकेट्स यांना लक्ष्य करू शकतात.
30 एप्रिल रोजी तीन दहशतवादीही दिसले होते
बांदीपोरामध्ये 10 मे पूर्वी, 30 एप्रिललाही तीन दहशतवाद्यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले होते. त्यापैकी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी उर्दू भाषिक आहेत. त्यांच्यासोबत एक स्थानिक दहशतवादीही होता. दोन पाकिस्तानी नागरिकांसोबत पकडलेला तिसरा दहशतवादी स्थानिक भाषा बोलत होता.