राजस्थानच्या दौसामध्ये झालेल्या डॉ. अर्चना शर्मा आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी भाजपाचे माजी आमदार आणि एका पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. तर दौसा एसपी यांची बदली करून इतर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ८ वर्षात हजारो लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉ. अर्चना यांच्या पतीनं न्यायाची याचना करत आहे.
डॉ. अर्चना शर्मा यांचे पती सुनीत उपाध्याय म्हणाले की, माझी पत्नी गेली परंतु अन्य कुठल्याही डॉक्टरसोबत असं कृत्य व्हायला नको. या प्रकरणात पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत असं त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार, लालूराम बैरवा यांची पत्नी आशादेवी यांना प्रसुतीवेदना होत असल्याने आनंद हॉस्पिटलमध्ये आणलं होते. प्रसुतीवेळी दुपारी आशादेवीचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. त्यात भाजपा नेते आणि समर्थकही सहभागी झाले. नातेवाईकांच्या आंदोलनानंतर डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे डॉ. अर्चना शर्मा मानसिक तणावाखाली गेल्या आणि दुसऱ्यादिवशी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
मृत्युपूर्वी लिहिलं सुसाईड नोट
डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात म्हटलं होतं की, मी कुठलीही चूक केली नाही. कुणालाही मारलं नाही. माझा मृत्यू कदाचित मी निर्दोष असल्याचं सिद्ध करेल. मी पती आणि मुलांवर खूप प्रेम करते. कृपया, माझ्या मृत्यूनंतर त्यांना कुणीही त्रास देऊ नका. पीपीएच कॉम्पलिकेशन होते. त्यासाठी डॉक्टरांना दोष देणे बंद करा. डॉक्टरांना त्रास देऊ नका. माझ्या मुलांना आईची कमतरता भासू देऊ नका असंही मृत्युपूर्वी डॉक्टर अर्चनानं म्हटलं होते.
डॉक्टर दाम्पत्य आठ वर्षांपासून चालवत होतेहॉस्पिटल
डॉ. अर्चना शर्मा या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या आणि त्यांचे पती डॉ. सुनीत उपाध्याय न्यूरो मानसोपचारतज्ज्ञ आहेत. हे दाम्पत्य आठ वर्षांपासून हॉस्पिटल चालवत होते. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आम्ही तिसऱ्या मजल्यावरील डॉ. अर्चना शर्मा यांच्या खोलीत गेलो, त्यावेळी दरवाजा बंद होता. अनेकदा ठोठावल्यानंतरही काहीच हालचाल झाली नाही, असं अर्चनाच्या पतीने सांगितले. त्यानंतर दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो उघडला नाही. मग पती डॉक्टर सुनीतने धक्का मारून दरवाजा उघडला, तेव्हा डॉक्टर अर्चना फासावर लटकत असल्याचे दिसून आले.
भाजपाचे माजी आमदार आणि एका पदाधिकाऱ्याला अटक
या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी भाजपचे माजी आमदार जितेंद्र गोठवाल आणि एका कार्यकर्त्याला गुरुवारी अटक केली. दोघांना लालसोट न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. भाजपचे प्रदेश मंत्री आणि माजी संसदीय सचिव जितेंद्र गोठवाल यांच्यावर डॉक्टर दाम्पत्याविरोधात आंदोलकांना भडकवण्याचा आणि रुग्णालय व्यवस्थापनाला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. याशिवाय राम मनोहर बैरवा यालाही अटक करण्यात आली आहे. स्थानिक सामाजिक संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. जितेंद्र गोठवाल आणि डॉ. किरोडीलाल यांच्या समर्थकांसह भाजपाचे कार्यकर्ते आंदोलनात भाग घेण्यासाठी आले होते, असा आरोप डॉ. अर्चनाचे पती डॉ. सुनीत यांनी केला आहे. आंदोलकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता.