इचलकरंजीत युवकाचा खून; धारधार शस्त्राने केले वार, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:01 AM2022-08-29T10:01:35+5:302022-08-29T10:08:30+5:30
काही दिवसांपूर्वी मित्रांबरोबर वाद झाला होता. या वादातूनच या तरुणावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
इचलकरंजी : येथील तीन बत्ती चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाचा खून झाला. राहुल बाबू दियालू (वय 22) असे त्याचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून एका कामगाराच्या मुलाचा धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दयाळ हा आपल्या कुटुंबियांसमवेत तीन बत्ती चौका नजीक राहत होता. त्याचा काही दिवसांपूर्वी मित्रांबरोबर वाद झाला होता. या वादातूनच राहुल याच्यावर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चाकूसारख्या धारदार शास्त्राने वार करून मारेकरी पळाले. रक्तबंबाळ झालेल्या राहुलला उपचारासाठी आयजीएम रुग्णालय दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. किरकोळ कारणातून त्याचा खून केला असल्याचे समजते.
याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करीत आहेत. दरम्यान, आयजीएम रुग्णालय परिसरात मृताचे नातेवाईक व मित्र यांनी गर्दी केली होती.