मुंबई : पाकिस्तानमध्ये बनावट नोटा तयार करुन त्या दुबईमार्गे भारतात तस्करी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहे. गुन्हे शाखेने केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवरुन ही कारवाई केली. यात तस्कर जावेद गुलमानबी शेख (३६) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकड़ून २३ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
गुन्हे शाखेला ९ फेब्रुवारीला दुबईतून भारतात मोठ्या प्रमाणात बनावट नोटाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पथकाने रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत भारतीय चलनातील तब्बल २३ लाख ८६ हजार रुपये किंमतीच्या २ हजार रुपयांच्या १ हजार १९३ बनावट नोटा सापडल्या. सोबतच पासपोर्ट आणि अन्य दस्तऐवज ताब्यात घेतले. यात हा आरोपी कळव्यातील रहिवाशी शेख असल्याचे उघड झाले. अखेर गुन्हे शाखेने याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन अटक केली.
पाकिस्तानात बनविलेल्या या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा दुबईमध्ये पोहोचवण्यात आल्या. तेथून भारतीय बाजारपेठेत चलनात आणण्यासाठी तस्करीचे काम शेखवर सोपविण्यात आल्याचे गुन्हेशाखेच्या तपासात समोर आले आहे.