नागपूर : अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आणि कित्येकांना फसविणारी कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास (वय ३९) हिला आज गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर करून तिचा २४ जूनपर्यंत पीसीआर मिळवला. आता पुढचे चार दिवस गुन्हे शाखेचे पथक तिची झाडाझडती घेणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांसोबत सलगी साधून त्यांच्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून कुख्यात प्रीती समाजसेवेच्या आड लोकांना ब्लॅकमेल करत होती. तिने चार जणांसोबत कथित लग्न केले आणि त्यांचे संसार देशोधडीला लावले. अशाचप्रकारे अनेकांशी मधुर संबंध प्रस्थापित करून त्यांनाही उध्वस्त केले.
प्रीतीने पोलिस अधिकार्यांशी असलेल्या संबंधाचा गैरफायदा घेऊन अनेकांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांनी फसवणूक केली. तर कित्येक लोकांना तिने ब्लॅकमेल केले. तिच्याविरुद्ध पाचपावली. लकडगंज, जरीपटका आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. वाढत्या दबावाखाली तिने पाचपावली पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. मात्र पोलीस चौकशीच्या नावाखाली प्रीती दासला मदत करून तिला वाचविण्याचे प्रयत्न करीत असल्याचा जोरदार आरोप झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. पाचपावली पोलिसांचा पीसीआर संपल्यानंतर शुक्रवारी तिची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी प्रॉडक्शन वॉरन्टच्या आधारे प्रीती दास हिला आज कारागृहातून ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर करून तिचा २४ जून पर्यंत पीसीआर मिळवला. दोन गुन्ह्याची होणार चौकशी गुन्हे शाखेचे पोलीस प्रीती दासची जरीपटका आणि सीताबर्डी पोलिस ठाण्याचे दाखल असलेल्या गुन्ह्याची चौकशी करणार आहेत. महिला पोलीस निरीक्षकेच्या नावाने एका गरीब वृद्धेकडून प्रितीने २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तर वर्ध्याच्या एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दीड लाख रुपये उकळल्यानंतर त्याला धमकी देऊन फसविन्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्ह्यांची चौकशी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भानुदास पिदूरकर आणि त्यांचे सहकारी करणार आहेत.