नवी दिल्ली - आयएनएक्स मीडियावर घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल दिल्ली हायकोर्टाने राखून ठेवला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंच्या म्हणजेच सीबीआयचे वकील आणि चिदंबरम यांचे वकील यांचा युक्तिवाद आज ऐकून घेतला आहे. त्यानंतर चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
पी. चिदंबरम यांना सीबीआयकडून आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली असून ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी कोर्टाने सुनावली आहे. एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकप्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कधी कल्पना सुद्धा केली नसेल की त्यांना तिहार तुरुंगात राहावे लागेल. मात्र, ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.