आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 06:34 PM2019-10-30T18:34:23+5:302019-10-30T18:36:34+5:30
आरोग्याच्या विचार करता त्यांना घरचं जेवण देण्यास कोर्टानं मुभा दिली आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांचा कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला असून त्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाकडे चिदंबरम यांची आणखी एक दिवस चौकशी करण्याची ईडीनं परवानगी मागितली होती. ती देखील कोर्टानं फेटाळून लावली. मात्र, त्यांच्या आरोग्याच्या विचार करता त्यांना घरचं जेवण देण्यास कोर्टानं मुभा दिली आहे.
पी. चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरला ईडीने चिदंबरम यांना अटक केली आहे. तिहार जेलमध्ये १६ ऑक्टोबरला सकाळी ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून त्यांची चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने मंगळवारी (15 ऑक्टोबर) ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी करण्याची तसेच आवश्यकता असल्यास अटकेची परवानगी दिली होती. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्याआधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकते असेही सांगितले होते. तिहार जेलमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, २८ ऑक्टोबरला अचानक प्रकृती बिघडल्याने चिदंबरम यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा रुग्णालयातून सोडून देण्यात आलं होतं. त्यांना पोटदुखीचा त्रास झाला होता. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याने रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने २२ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. सीबीआयच्या एका प्रकरणात एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना हा जामीन मिळाला होता. मात्र, जामीन मिळूनही चिदंबरम तिहार तुरुंगातच होते. कारण चिदंबरम हे ईडीच्या कोठडीत होते. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीने त्यांच्याविरोधात वेगवेगळे खटले दाखल केलेले आहेत.
INX media case: Congress leader P. Chidambaram sent to judicial custody till 13th November. Court has also rejected Enforcement Directorate's (ED) application, seeking Chidambaram's remand for one more day. (file pic) pic.twitter.com/2YvVMpCfkZ
— ANI (@ANI) October 30, 2019