अमरावती : आयपीएलमधील लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद या संघामध्ये ८ मे रोजी खेळविल्या गेलेल्या सामन्यावर सट्टा खाणाऱ्या एकाला राजापेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला. विशाल शिवनारायण निर्वाण (२४, रा. अंबागेट, अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन आरोपी घटनास्थळाहून पसार झाले. २० मार्चपासून सुरू झालेल्या यंदाच्या आयपीएल हंगामातील ही पहिली कारवाई ठरली आहे. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आयपीएल जुगारावर प्रतिबंध घालण्याचे आदेश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. बरहुकूम राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांच्या मार्गदर्शनात डीबी प्रमुख मनीष करपे यांच्या पथकाने ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता शंकरनगर स्थित कॅन्सर हॉस्पिटलसमोर ही कारवाई केली. तेथे एक इसम हा लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद या क्रिकेट सामन्यावर मोबाइल फोनच्या साहाय्याने बेटिंग घेऊन जुगार खेळत असल्याची माहिती करपे यांना मिळाली होती. त्यानुसार तेथून विशाल निर्वाण याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोबाइल व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध फसवणुकीसह इंडियन टेलिग्राफ ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
...यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांच्या नेतृत्वात सीआययू पथकप्रमुख तथा सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, जमादार मनीष करपे, पंकज खटे, विजय राऊत, रवी लिखितकर, गणराज राऊत, सागर भजगवरे, सुनील लासुरकर, विनय मोहोड, विनोद काटकर आदींनी ही कारवाई केली.