इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : सुधाकर शेट्टीच्या फ्लॅट,कार्यालयावर ईडीचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 08:10 AM2020-01-31T08:10:11+5:302020-01-31T08:13:13+5:30
एकूण सहा ठिकाणी कारवाई करून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त, सुमारे 700 कोटीची गुंतवणूक त्याच्या कंपनीत झाली असल्याचा संशय
मुंबई - मृत गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या मालमता विक्री गैर व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनाकडून (ईडी ) कारवाईचा धडाका सुरुच असून गुरुवारी वादग्रस्त व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्या आलिशान फ्लॅट व कार्यालयावर छापे मारले. रात्री उशिरापर्यंत झडतीची कारवाई सुरु होती .
एकूण सहा ठिकाणी कारवाई करून महत्वपुर्ण दस्ताऐवज जप्त केला आहे .सुमारे 700 कोटीची गुंतवणूक त्याच्या कंपनीत झाली असल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले . सोमवारी ईडीने याप्रकरणी डीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली आहे .सहा महिन्यापूर्वी याबाबत मनी लाँँन्डीगचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरनात दहावर जणांना अटक केली आहे .
दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार व मुंबई बॉम्बस्फ़ोटातील फरारी आरोपी इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या नावाची मालमत्ता विक्रीत अनेक बडी मंडळी सहभागी आहेत.
तपासासाठी ईडीने गुरुवारी सुधाकर शेट्टी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे मारले. सुधाकर शेट्टी हे बांधकाम व्यावसायिक असून मुंबईत काही ठिकाणी त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी एक मराठी वृत्तवाहिनीदेखील सुरू केली होती. काही महिन्यांआधी त्या वाहिनीची अर्धी मालकी विकली असल्याची चर्चा होती.
अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंधित बनावट कंपन्यांना २१०० कोटींचे कर्ज दिल्याच्या आरोपावरून वाधवान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. वाधवान यांच्या 'डीएचएफएल'ने मिर्चीशी संगनमताने २१०० कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचाही 'ईडी'ला संशय आहे. यामुळेच यासंबंधी मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत 'ईडी' त्याचा तपास करीत आहे. वाधवान यांच्या चौकशीनंतर शेट्टी यांच्या घरावर व कार्यालयावर छापे मारण्यात आले.