गिफ्टसह डॉलरच्या आमिषाने आयर्लंडच्या फेसबुक मित्राकडून महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 06:05 AM2020-02-10T06:05:05+5:302020-02-10T06:05:27+5:30
काळबादेवी येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय तक्रारदार महिला एका केक कंपनीत नोकरीला आहे.
मुंबई : आयर्लंडच्या फेसबुक मित्राने महागड्या गिफ्टसह डॉलर आणल्याचे आमिष दाखवून काळबादेवीतील महिलेची ४० हजार रुपयांना फसवणूक केली आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळबादेवी येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय तक्रारदार महिला एका केक कंपनीत नोकरीला आहे. महिनाभरापूर्वी एका अनोळखी तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली. चार्ली ओवेन असे त्याने नाव सांगून तो आयर्लंडमध्ये ज्वेलरी, हिरे खरेदी-विक्री करण्याचे काम करत असल्याबाबत सांगितले. तसेच ते दोघे एकाच धर्माचे असल्यामुळे त्यांच्यातील संवाद वाढला. एकमेकांचे मोबाइल क्रमांकही शेअर झाले.
याच दरम्यान सुट्टी असल्याने चार्लीने ४ फेब्रुवारी रोजी विमान तिकीट पाठवून ५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता दिल्ली विमानतळ येथे उतरणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ५ तारखेला सकाळी दहा वाजता दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून, चार्लीकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याने त्यांना सोडविण्यासाठी ४० हजार रुपये भरण्यास सांगितले. महिलेनेही विश्वास ठेवून आॅनलाइन पैसे पाठविले. त्यापाठोपाठ पुन्हा आरोपींनी कॉल करून आणखीन एक लाख ८६ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, संशय आल्याने महिलेने पैसे भरण्यास नकार दिला.
याबाबत दिल्ली विमानतळ येथे चौकशी करताच त्यांनी अशा कुठल्याही व्यक्तीला पकडले नसल्याचे समजले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी शनिवारी एल.टी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.