मुंबई - राज्यातील राजकारणात अजित पवारांच्या बंडामुळे मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपासोबत हातमिळवणी करत शनिवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ९ प्रकरणांची उघड नियमित चौकशी तूर्तास बंद करण्यात आली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पातील ९ केसेसची नियमित चौकशी बंद करण्यात आली असून त्याचा तपास सुरु राहणार असल्याची माहिती एसीबीचे महासंचालक परबीर सिंग यांनी देत खुलासा केला आहे.
एसीबीने याबाबतचे पत्र अमरावतीचे एसीबीचे पोलीस अधीक्षक यांना पाठविले आहे. एसीबीकडून सिंचन विभागाशी संबंधित २६५४ निविदांची चौकशी केली जात असून त्यापैकी ४५ प्रकल्प हे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे आहेत. नागपूर खंडपीठासमोर २ जनहित याचिका २०१२ साली दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २१२ निविदा प्रकरणी उघड चौकशी पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी २४ केसेसची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ५ केसेसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चौकशी दरम्यान कोणतेही ठोस पुरावे हाती न लागल्याने ४५ निविदांची चौकशी बंद करण्यात आली आहे, असे महासंचालक (एसीबी) परमबीर सिंग यांनी सांगितले.आज नऊ केसेस बंद करण्यात आल्या असून त्याचा अजित पवार यांच्याशी संबंध नसून त्यामध्ये अजून काही माहिती समोर आली किंवा न्यायालयाने आदेश दिला तर पुन्हा सुरु करण्यात येतील असं एसीबीकडून माहिती देण्यात आली आहे.