कुटुंबियांनाच संपविण्याच्या तयारीने ‘तो’ आला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 02:58 PM2019-04-17T14:58:13+5:302019-04-17T15:21:51+5:30
तो मोठे हत्याकांड करण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़. मात्र, दारातच रोहित दिसल्याने त्याने त्याच्या अंगावर अॅसिड टाकले़.
पुणे : सदाशिव पेठेत टिळक रोडलगतच्या गल्यातील तरुणावर अॅसिड टाकून स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केलेल्या सिद्धराम विजय कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या इराद्यानेच आल्याचे आढळून आले आहे़. त्याच्याकडील बॅगेत पंच, २ कोयते आणि २ चाकू आढळून आले आहेत़. याप्रकरणी त्याच्या मैत्रिणीने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. मयत आरोपींविरोधात अॅसिड हल्ला व पोलिसांवर फायरिंग केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सिद्धराम कलशेट्टी याने सदाशिव पेठेतील स्वप्नगंध अपार्टमेंटसमोर मैत्रिणीबरोबर बोलत उभ्या असलेल्या रोहित खरात याच्या अंगावर अॅसिड टाकले व तो शेजारील आनंदी निवास इमारतीत लपून बसला होता़. त्याला शोधण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने दोन गोळ्या झाडल्या व त्यानंतर इमारतीवरुन डक्टमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती़. या संपूर्ण घटनेने पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिद्धराम कलशेट्टी हा अक्कलकोट येथे तेलाचा व्यापारी आहे़. रोहित व त्याची आई अक्कलकोटला दर्शनासाठी गेले असताना त्यांची ओळख झाली होती़. त्यातून रोहितची आईबरोबर त्याची फेसबुकवर मैत्री होती़. दरम्यान, कलशेट्टी याने काही अश्लिल मेसेज टाकल्यामुळे रोहितच्या आईने त्याच्याविरुद्ध ऑक्टोंबर २०१८ मध्ये विनयभंगाची फिर्याद दिली होती़. त्यावरुन पोलिसांनी कलशेट्टी याला अटक केली होती़. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता़.
दरम्यान, मधल्या काळात त्यांच्यात काही घडामोडी घडल्या काय याची माहिती अद्याप समोर आली नाही़. मात्र, मंगळवारी रात्री कलशेट्टी संपूर्ण तयारीनिशी आला होता़. त्याच्याकडील बॅगेत मारामारी करायचा पंच, २ कोयते व २ नवे कोरे चाकू होते़ त्याचबरोबर गावठी पिस्तुलही होते़. त्यावरुन तो मोठे हत्याकांड करण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़. मात्र, दारातच रोहित दिसल्याने त्याने त्याच्या अंगावर अॅसिड टाकले़. दरम्यान, रोहितवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती गंभीर आहे़. याप्रकरणी त्याच्या मैत्रिणीने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.
कलशेट्टीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येत असून त्याचे नातेवाईक गावावरुन आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़.