नवी दिल्ली - देशात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत कोट्यवधी रुपये जप्त केले जात आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका ARTO अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपये सापडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अधिकाऱ्याच्या घरी पगारापेक्षा 650 पट अधिक मालमत्ता सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरचे ARTO (प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी) संतोष पॉल यांच्या घरासह अनेक ठिकणी धाड टाकली. या धाडीमुळे एकच खळबळ उडाली.
ईओडब्ल्यूच्या पथकांनी एकाच वेळी पॉलच्या शताब्दीपूरम येथील आलिशान पेंटहाऊस आणि गार्हा फाटक येथील त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीवरही धाड टाकली. संतोष पॉल यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार ईओडब्ल्यूकडे आली होती. ही तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ईओडब्ल्यूने हा तपास सुरू केला. हे धाडसत्र आणि कागदपत्रांची पडताळणी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. पॉल यांच्याकडे त्यांच्या पगारापेक्षा 650 पट जास्त बेहिशेबी मालमत्ता असल्याचं या धाडीतून समोर आलं.
300 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक असल्याचं सांगितलं जात आहे. संतोष पॉल हे जवळपास 4 वर्षांपासून जबलपूरमध्ये तैनात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओच्या विविध कामांमध्ये त्यांचे अनेक नातेवाईक कंत्राटी आणि भागीदारही आहेत. संतोष पॉल यांच्या विरोधात गेल्या काही वर्षांत बनावट जात प्रमाणपत्र, गांजा विक्रीच्या खोट्या आरोपाखाली ऑटोचालकाला गोवण्याची धमकी देणे, नोंदणी, परवाना, परमिट यासह व्हीआयपी क्रमांकाचे मनमानी शुल्क आकारणे, कमिशन घेणे अशी अनेक प्रकरणं उघड झाली आहेत.
एआरटीओमध्ये पदावर असताना संतोष पॉल यांनी कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचंही या धाडीनंतर समोर आली. एवढी संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले. याप्रकरणी ईओडब्ल्यूमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.