तळेगाव दाभाडे : येथील मुख्य बाजारपेठेतील ज्वेलर्सच्या दुकानामधून अज्ञात चोरट्याने २७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १० हजार रुपए लंपास केले. सोमवारी (दि. ३०) सकाळी हा प्रकार घडला. सीसीटीव्ही कॅमेºयात चोरटा कैद झाला आहे. तपासासाठी पोलिसांची पाच पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अशोक जव्हेरचंद ओसवाल (वय ५६, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव येथील मारुती मंदिर चौकाजवळील मुख्य बाजारपेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी ओसवाल मित्रांसह मुंबईकडे रवाना झाले. जाताना दुकानाचे शटर खाली घेतले व सुनेला ते आतून बंद करण्यास सांगितले. मात्र शटर आतून बंद करण्याबाबत त्या विसरल्या. दरम्यान, त्या खाली येण्याआगोदर अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करून १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, २५ लाख ७० हजार ४०० रुपये किमतीचे ६८ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ६ हजार रुपये किमतीची बेन्टेक्स ज्वेलरी, २ हजार ९०० रुपये किमतीचे गजलक्ष्मीचे दोन नग, रोख रक्कम १० हजार रुपये, तसेच ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण २७ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून चोरट्याने हा ऐवज दुकानातील कचरा गोळा करण्याच्या गोणीतून नेला. चोरट्यास स्ट्राँग रूमकडे जाता आले नाही. सुमारे १७ मिनिटांचा चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास तातडीने पाचारण करण्यात आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलिसांनी पाच पथके लोणावळा, कामशेत, देहूरोड, पुणे, मुंबई या ठिकाणी रवाना केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर तपास करीत आहेत.
तळेगाव दाभाडे येथे ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून २७ लाखांच्या दागिन्यांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:25 PM
घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद..
ठळक मुद्देतळेगाव येथील मारुती मंदिर चौकाजवळील मुख्य बाजारपेठेत ज्वेलर्सचे दुकान