मुंबई - जेएनयू विद्यापीठात घुसून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पाश्वभूमीवर राज्यातील विद्यार्थी संघटनांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिले आहेत. महाविद्यालये, विद्यापीठातील परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये,यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना घटक प्रमुखांना केल्या आहेत.
रविवारी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाच्या परिसरात घुसून विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या भ्याड हल्याचा देशभरात निषेध होत आहे. राज्यात मुंबईसह विविध महानगर व लहान शहरातही सामाजिक संघटना आणि महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाला कसलेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी संबंधित घटकांशी बोलून चर्चा करावी, आंदोलकांवर आक्रमक कारवाई करु नये, अशा सूचना अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांनी सर्व पोलीस प्रमुख व घटकप्रमुखशंना केल्या आहेत. आंदोलनाचा परिणाम सामान्य नागरिक व अन्य विद्यार्थ्यांना होवू नये,यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घ्यावयाची आहे.