नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक : १७ बेरोजगारांना २८ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 08:35 PM2020-02-04T20:35:01+5:302020-02-04T20:36:14+5:30
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल १७ बेरोजगार तसेच त्यांच्या पालकांची फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेतनोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल १७ बेरोजगार तसेच त्यांच्या पालकांची फसवणूक केली. नीलेश अग्रवाल ऊर्फ तिजारे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. फसगत झालेल्यांनी पोलिसांकडे धाव घेतल्याने गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या त्याच्या या ठगबाजीचा सोमवारी भंडाफोड झाला.
ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारे सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेपललिफ होम, इंजिनिअर को-ऑप सोसायटी, सोमलवाडा येथे राहतो. रेल्वे खात्याशी कसलाही संबंध नसताना ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारे स्वत:ला रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खास माणूस आहो, असे सांगत होता. आपले अनेक वरिष्ठांशी घनिष्ट संबंध असल्यामुळे आपण रेल्वेत सहज नोकरी लावून देतो, अशी थाप तो मारत होता. त्याच्या या थापेबाजीत १२ सप्टेंबर २०१७ ला पवनकुमार गिरिराम शिव (वय २९, रा. गवळीबाबानगर, खरबी) हा अडकला. त्याने नोकरीच्या आशेने आरोपी अग्रवाल ऊर्फ तिजारेला ५० हजार रुपये दिले. त्याच्यासारखेच नंतर अनेक तरुण आरोपीच्या जाळ्यात अडकले. प्रत्येकाकडून आरोपी अग्रवालने वेगवेगळी रक्कम घेतली. १२ सप्टेंबर २०१७ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत तब्बल १७ लोकांना त्याने गंडा घातला. सर्वांकडून एकूण २८ लाख, १० हजार रुपये अग्रवालने हडपले.
विशेष म्हणजे, आरोपीने उपरोक्त पीडितांची मेयो आणि मेडिकलमधून वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांची शैक्षणिक कागदपत्रेही घेतली. नंतर नियुक्तीपत्र देण्याची थाप मारून तो टाळाटाळ करू लागला. प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण तो टाळत असल्याचे लक्षात आल्यामुळे काहींना त्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना विचारणा केली असता ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारेसोबत रेल्वे विभागाचा अथवा अधिकाऱ्यांचा कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी ठगबाज अग्रवालकडे रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावला. प्रत्येकाला वेगळी तारीख सांगून तो परत पाठवू लागला. पहिल्याला रक्कम देण्यासाठी तो दुसरे नवीन सावज शोधत होता. तो रक्कम परत करणार नाही उलट दुसºया अनेकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्याने पीडितांनी सोनेगाव ठाण्यात संपर्क केला. सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारेला अटक केली. त्याने अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातल्याचा संशय ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी व्यक्त केला. चौकशीत काय ते पुढे येईल, असे ते म्हणाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी ठगबाज अग्रवालकडे रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावला. प्रत्येकाला वेगळी तारीख सांगून तो परत पाठवू लागला. पहिल्याला रक्कम देण्यासाठी तो दुसरे नवीन सावज शोधत होता. तो रक्कम परत करणार नाही उलट दुसऱ्या अनेकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्याने पीडितांनी सोनेगाव ठाण्यात संपर्क केला. सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारेला अटक केली. त्याने अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातल्याचा संशय ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी व्यक्त केला. चौकशीत काय ते पुढे येईल, असे ते म्हणाले.