मुंबई : साकीनाका येथील उच्चशिक्षित तरुणाला फ्रेंडशिप क्लबची नोकरी चांगलीच महागात पडली. नोकरी तर मिळाली नाहीच, उलट सव्वा लाख रुपये गमाविण्याची वेळ त्याच्यावर आली. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, अधिक तपास सुरू केला आहे.
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला हेमराज वर्मा (३२) हा नोकरीसाठी मुंबईत आला. मागील ९ वर्षांपासून तो अंधेरीत खासगी कंपनीत नोकरी करत होता. याच दरम्यान जानेवारीत त्याला अनोळखी महिलेने कॉल करून फ्रेंडशिप क्लबमधून बोलत असल्याचे सांगितले, क्लबमधील नोकरीची आॅफर दिली. फ्रेंडशिप क्लबअंतर्गत महिलेसोबत मीटिंग करायची. एका मीटिंगसाठी १८ हजार रुपये मिळतील, त्यापैकी १५ टक्के क्लबमध्ये जमा करायची. उर्वरित रक्कम तुमचे कमिशन असेल, असे सांगितले. या आमिषाला बळी पडून वर्माने नोकरीसाठी होकार दिला. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे त्याने नोंदणीसाठी दोन हजार रुपये भरले. त्यानंतर, पहिल्या मीटिंगचे पैसे भरावे लागणार असल्याचे सांगून त्याच्याकडून १० हजार रुपये उकळले. हे पैसे परत मिळणार असल्याने वर्माने ते जमा केले.
पुढे सुमन शर्मा नावाच्या महिलेसोबत पहिली मीटिंग ठरली. मीटिंगसाठी त्यानेच १४ हजार रुपये भरून हॉटेलची रूम बुक केली. त्यानंतर, अशाच प्रकारे विविध कारणांसाठी त्याने ७८ हजार रुपये खात्यावर जमा केले. पैसे परत मिळतील असे त्याला सांगण्यात आले होते. परंतु ज्या महिलेसोबत मीटिंग करायची होती, तिने फोन घेणे बंद केले.
अखेर पोलिसांत तक्रारपहिली मीटिंग फसल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला फोन करून तुमचे सर्व पैसे मिळतील, असे सांगत, दुसऱ्या एका महिलेशी मीटिंग करण्यासाठी सांगण्यात आले. नोंदणी म्हणून पुन्हा त्याच्याकडून १२ हजार रुपये उकळले. मीटिंगपूर्वी वैद्यकीय तपासणी करावी लागेल, तपासणीसाठी आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील, असे सांगून त्याच्याकडून पुन्हा २० हजार रुपये उकळण्यात आले. मात्र, प्रतिनिधी घरी न आल्याने त्याने फोन केला असता, तो बंद होता. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, मंगळवारी त्याने साकीनाका पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.