राजस्थान जोधपूरच्या बनाड पोलीस स्टेशनने हनीट्रॅपसाठी अपहरण आणि खंडणीच्या आरोपात पाच लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की, हरिराम विश्र्नोईने तक्रार दाखल केली होती की, त्यांचा मुलगा श्रवणचं काही लोकांनी अपहरण केलं. नंतर या केसमध्ये फारच धक्कादायक खुलासा झाला.
पोलिसांनुसार, श्रवणला सोडण्याच्या बदल्यात ७० लाख रूपये खंडणी मागण्यात आली होती. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, एका महिलेसोबत त्याचे काही अश्लील-आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून रेप केल्याची केस दाखल करण्याची धमकीही दिली आहे. बनाड पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा मुख्य पाबूराम विश्नोई नात्याने श्रवणचा भाऊ लागतो.
पोलिसांनी सांगितलं की, एम्स जोधपूरमध्ये वार्ड बॉयची नोकरी करणाऱ्या श्रवणला ३ ऑक्टोबर रोजी शिकारगढ येथील मिनी मार्केटजवळ पाबूरामने आपल्या रूमवर बोलवलं होतं. इथे एक तरूणीही होती. श्रवण रूममध्ये गेल्यावर त्याला काही लोकांनी पकडलं. यावेळी पाबूरामसोबत विकास जाट, पूनाराम विश्नोई, विनीत मेघवाल आणि सहदेवही होते.
सर्व लोकांनी मिळून श्रवणला मारहाण केली आणि रूममध्ये असलेल्या तरूणीसोबत त्याचे काही अश्लील फोटो काढले. यानंतर आरोपींनी श्रवणच्या वडिलांना फोन करून ७० लाख रूपये खंडणी मागितली. श्रवणचे वडील हॉटेल व्यावसायिक आहेत. फोन आल्यावर त्याच्या वडिलांनी पोलिसांना सूचना दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपींचा लोकेशनच्या आधारावर शोध घेतला. आरोपींना खबर लागली की, पोलीस त्यांच्यामागे आहेत. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा जागा बदलत होते. बुधवारी रात्री आरोपी श्रवणला घेऊन रेल्वे स्टेशन जवळच्या हॉटेलमद्ये गेले. पोलीस तिथे गेले तर आरोपी श्रवणला घेऊन बाहेर आले. अशात पोलिसांनी घेराबंदी करून आरोपींना पकडलं. सोबतच श्रवणला आरोपींच्या तावडीतून सोडवलं.