दुसऱ्या धर्मातील वर्गमैत्रिणीसोबत केला प्रवास; बस अडवून तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 07:44 PM2021-04-02T19:44:58+5:302021-04-02T19:45:49+5:30
Attempt to Murder : मुलाला मारहाण करण्यात आली आणि जेव्हा मुलीने मारेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही दुखापत झाली."
बंगळुरू - दुसर्या धर्मातील एका युवतीबरोबर बसमध्ये प्रवास करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला मारहाण करून भोसकण्यात आले. ही घटना कर्नाटकातील मंगळुरु येथे गुरुवारी घडली आहे. मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार म्हणाले, काल मंगळुरू शहरात रात्री ९. ३० वाजताच्या सुमारास एक बस अडविण्यात आली आणि वर्गमित्र असलेल्या तरुण, तरुणीला वेगवेगळ्या धर्मातील असल्याने त्यांना वाहनातून खाली उतरविण्यात आले. मुलाला मारहाण करण्यात आली आणि जेव्हा मुलीने मारेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही दुखापत झाली."
याप्रकरणी आता “सात-आठ जण पोलीस कोठडीत आहेत आणि तसेच यात सहभागी असलेल्या चौघांना लवकरच अटक केली जाईल, ते बजरंग दलाशी संबंधित आहेत,” असे पोलीस आयुक्तांनी एनडीटीव्हीला सांगितले. कुमार पुढे म्हणाले, "चारजण कारमधून आले आणि त्यांनी बस थांबवली. मुलाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर त्यांच्याकडून चाकूचा वार देखील करण्यात आला. जखमी तरुण रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे," असे कुमार यांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, ही युवती बंगळुरुला जात होती आणि तिचा वर्गमित्र तिच्यासोबत होता. कारण तो तरुण मंगळुरु शहराशी अधिक परिचित होता. कुमार यांनी सांगितले ,"दोघेही वर्गमित्र होते आणि मुलीने आम्हाला सांगितले की, ती मुलाला बर्याच वर्षांपासून ओळखते," .
याप्रकरणी जबाबदार असलेल्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या निगराणीखाली विशेष पथके तयार केली गेली आहेत. ज्या दोन तरुणांनी याबाबत माहिती शेअर केली यांची देखील माहिती पोलीस काढत आहेत. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात पूर्वीही जातीय तणावाच्या घटना घडल्या आहेत.