प्रीती दास प्रकरणाचे गौडबंगाल कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:29 PM2020-07-02T20:29:01+5:302020-07-02T20:30:42+5:30
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होऊन आणि पाचपावली तसेच गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास होऊनही पोलिसांनी तपासात नेमके काय केले, ते स्पष्ट झाले नसल्याने जनमानसाठी प्रीती दास प्रकरण गौडबंगाल ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होऊन आणि पाचपावली तसेच गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास होऊनही पोलिसांनी तपासात नेमके काय केले, ते स्पष्ट झाले नसल्याने जनमानसाठी प्रीती दास प्रकरण गौडबंगाल ठरले आहे.
प्रारंभी मधाळ बोलून सलगी साधणारी प्रीती सावज जाळ्यात अडकल्यानंतर त्याच्यासोबत अत्यंत कठोरपणे वागत होती. तिने मधाळ बोलून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि नंतर त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. प्रीतीने अनेकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केले. अनेकांची कुटुंबेही प्रीतीने उद्ध्वस्त केली. तिच्या पापाचा घडा फुटल्यानंतर प्रीतीविरुद्ध पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि सीताबर्डी ठाण्यात गुन्हे दाखल झाले. मात्र, तपासादरम्यान प्रीतीची कर्तव्यकठोरपणे झाडाझडती घेण्याऐवजी प्रीतीला मदत होईल, अशा टिप्स मिळाल्या. ती कोठडीत असताना तिच्याकडे काहीही मिळत नसल्याचे पोलीस सांगत होते. दुसरीकडे गुन्हे शाखेने तिला ताब्यात घेताच तिच्याकडून रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे पाचपावली पोलिसांनी तिचा तपास प्रामाणिकपणे केला नाही, हे अधोरेखित झाले आहे. हा एकच मुद्दा नाही तर असे अनेक संशयास्पद मुद्दे आहेत, ज्यामुळे पाचपावली पोलिसांसोबत असलेली घनिष्ठता चर्चेला आली आहे. गुन्हे दाखल होण्यापूर्वी गोडबोले प्रीतीच्या दिमतीला राहायचा. गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याने तिला भरपूर मदत केल्याचा आरोप आहे. गोडबोलेसोबत आणखी काही नावे प्रीतीसोबत चर्चेला आली होती. वरिष्ठांकडून त्याकडे का लक्ष देण्यात आले नाही, असा प्रश्न आहे.
का झाले बेदखल?
प्रीतीच्या सांगण्यावरून पाचपावली पोलिसांनी अनेकांना प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यांचे आर्थिक शोषण करण्यात आले. त्यातील एका पीडिताचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रीतीला ज्या कथित नेत्याने साथ दिली त्याचीही चौकशी करण्याचे पोलिसांनी टाळले. प्रीतीविरुद्ध शीतल आणि इरशादने तक्रारी दिल्या. मात्र, तक्रार दिल्यानंतर ते पुन्हा ठाण्यात येणार नाहीत, अशी पाचपावलीतील प्रीतीच्या साथीदारांनी व्यवस्था केली. दुसरीकडे ते ठाण्यात येतच नाहीत, असा कांगावाही केला आहे. व्हिडिओ, तक्रारी, ओरड सारेच्या सारेच बेदखल झाल्याने पोलिसांची कुख्यात प्रीतीवरची माया होती तशीच असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.