लहानग्याच्या दुधाच्या पैशांमधून इडली घेतली; दारुड्या पित्याने करणचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 06:07 AM2022-01-03T06:07:50+5:302022-01-03T06:08:00+5:30
छाेट्या बहिणीने माहिती देताच दारुड्या पित्याचा राग झाला अनावर
- जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अवघ्या २० दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या लहानग्या बाळासाठी राखून ठेवलेल्या पन्नास रुपयांमधून करण प्रजापती या दहा वर्षीय मुलाने आईच्या परवानगीने इडली खाण्यासाठी वडिलांचे पैसे घेतले. हेच पैसे चोरल्याच्या संशयातून त्याचा पिता प्रदीप उर्फ बबलू प्रजापती याने करणला बुधवारी रात्री बेदम मारहाण केली. या जबर मारहाणीत पाण्याचा पाइपही तुटला. त्यानंतरही या मद्यपी पित्याने लोखंडी पाइपने मारहाण सुरूच ठेवली, ती अगदी करण निपचित पडेपर्यंत...
कळवा, खारेगावपासून पारसिकनगरचा डोंगर ओलांडल्यानंतर भास्करनगर आणि त्यानंतर असलेल्या वाघोबानगरातील डोंगरावर असलेल्या लक्ष्मीनगर चाळीत अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे रविवारीदेखील आपल्या मुलाच्या मृत्युमुळे त्याची आई बिमला सावरलेली नाही. तिला अजूनही करण येईल, त्याला भूक लागलेली असेल, तो कुठे आहे, अशी ती नातेवाईक आणि शेजाऱ्यांना विमनस्क अवस्थेत विचारपूस करीत असते. रविवारी तिच्या घरी जाऊन प्रस्तुत प्रतिनिधीने तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपले मूल नाहक गमावल्यामुळे तिचे ओघळणारे अश्रू बरेच काही बोलून गेले.
तिथे उपस्थित असलेली बबलूची चुलत बहीण पूनम प्रजापती (२१) म्हणाली, तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा. त्याला करण (१०), गुड्डी (९), किसन (अडीच वर्षे) आणि २० दिवसांची वर्षा अशी चार मुले होती. लहानग्या वर्षासाठी हगिज आणि दुधासाठी ठेवलेलेच पन्नास रुपये करणने चोरल्याचा बबलूचा समज झाला. हे पैसे कोणी घेतले, अशी तो विचारणा करीत होता. ते करणने घेतल्याचे गुड्डीकडून समजल्यानंतर त्याचा पारा चढला. बांधकामावर मजुरी करणाऱ्या बबलूने प्लॅस्टिकच्या पाइपने मुलाला मारहाण केली. हा पाइपही तुटला, मग त्याने थेट पाण्याच्या लोखंडी पाइपने जबर मारहाण केल्याचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी सांगितले.
चुलता आणि आजोबांनी केले अंत्यसंस्कार
बबलूने स्वत:च्या भावाला घरातून सात वर्षांपूर्वी हाकलून दिले होते. करणच्याच वाढदिवसाला घरी आलेल्या वशिष्ठ प्रजापती या त्याच्या चुलत्याबरोबरही त्याने असेच भांडण उकरले होते. शनिवारी मोठ्या जड अंत:करणाने करणवर चुलते वशिष्ठ, आई आणि आजोबांनी अंत्यसंस्कार केले. आपल्या मुलांना तो खायलाही देत नव्हता. मग, मुलाने आईच्या सांगण्यानुसार हे पन्नास रुपये घेतले तर काय गुन्हा केला, असा सवाल बबलूचीच बहीण पूनमने उपस्थित केला. पत्नी आणि मुलांना बबलू नेहमीच दारू पिऊन मारहाण करायचा. पण त्या दिवशी इतके मुलाला मारले असेल, याचा काहीच अंदाज आला नसल्याचे प्रजापती यांच्या शेजारी रुसा जयस्वाल आणि सागर खरात यांनी सांगितले. आपल्या पित्यानेच भावाला मारल्याचे सांगणाऱ्या गुड्डीचाही जबाब पोलिसांनी रविवारी नोंदवला.