Apple कंपनीच्या आयफोनची क्रेझ जगभरात आहे. आयफोन विकत घेण्यासाठी किडनी विकण्याची तयारी असल्याचं अनेकदा आपण मस्करीत किंवा याबाबतचे विनोद सोशल मीडियात आपण पाहिले आहेत. पण कर्नाटकात एक असं भयंकर प्रकरण उघडकीस आलं आहे की एका तरुणानं आयफोनसाठी खळबळजनक प्लानिंग करत एका डिलिव्हरी बॉयची हत्या केली आहे. इतकंच नव्हे, तर त्याचा मृतदेह तीन दिवस घरात ठेवला. मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आयफोनच्या नादात चक्क एकाची हत्या करण्याचं हे प्रकरण कर्नाटकातील हासन जिल्ह्यात अर्सिकेरे शहरात घडलं आहे. धक्कादायक बाब अशी की आरोपी अवघ्या २० वर्षांचा आहे. तर ज्याची हत्या करण्यात आली आहे तो २३ वर्षांचा आहे.
अर्सिकेरे शहरातील अंककोप्पल रेल्वे स्टेशनजवळ ११ फेब्रुवारी रोजी कर्नाटक पोलिसांना एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. रेल्वे स्थानकाजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधिकाऱ्यांनी याचा तपास करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आणि तपासात जी माहिती उघड झाली त्यानं सर्वच अवाक् झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्सिकेरे शहराच्या लक्ष्मीपुरा लेआउटजवळ राहणाऱ्या हेमंत दत्तानं (२०) एक सेकंड हँड आयफोन ऑनलाइन बुक केला होता. तो घरपोच करण्याची जबाबदारी ई-कार्टच्या डिलिव्हरी बॉय हेमंत नाइककडे होती. हेमंत नाइक आयफोनची डिलिव्हरी करण्यासाठी वेळेत हेमंत दत्ताच्या घरी पोहोचला. फोनची डिलिव्हरी देताना त्यानं फोनचे ४६ हजार रुपये मागितले. पैसे घेण्यासाठी हेमंत दत्ता यानं घरात बोलावलं आणि डिलिव्हरी बॉय घरात येताच त्याची चाकूनं वार करुन हत्या केली. डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. पण आता मृतदेहाचं काय करायचं हे आरोपी हेमंत दत्ता याला कळेनासं झालं. त्यानं चक्क तीन दिवस राहत्या घरातच मृतदेह लपवून ठेवला होता.
तीन दिवस मृतदेहाच्या विल्हेवाटासाठी जागेचा शोध घेतला. त्यानंतर एकेदिवशी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी मृतदेह एका गोणीत भरुन चक्क स्कूटीवरुन आरोपी निघाला. आरोपीनं अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळ एका निर्जनस्थळी मृतदेह आणला आणि निश्चित केलेल्या जागेवर टाकला. पुढे त्यानं मृतदेहाला आग लावून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी हेमंत दत्ता याचा माग काढला आणि त्याला अटक केली. त्यानंतर हेमंत दत्तानं हत्येमागची ही संपूर्ण कहाणी पोलिसांनी सांगितली.