कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवल्याचा दोन कोटीला भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 08:44 PM2020-01-28T20:44:42+5:302020-01-28T20:57:27+5:30
तुरुंगाच्या दुरुस्तीच्या खर्चात झाली दुप्पटीने वाढ; २.५ कोटी काम पोहचले ४.५ कोटीला
जमीर काझी
मुंबई : २६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्यावेळी जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब याला फाशी देवून सहा वर्षाहून अधिक काळ लोटला असलातरी त्याचे परिणाम राज्य सरकारला अद्याप भोगावे लागत आहे. कसाबला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवल्याचा फटका जेलमधील अन्य सुधारणाची कामे १२ वर्षे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे त्यासाठीच्या खर्चांत दुप्पटीने वाढले असून एका बॅरकच्या तळमजला व पहिल्या मजल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल चार कोटी ४९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
ऑर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक-१ मध्ये तळ व पहिल्या मजल्याची बांधकाम दुरुस्ती आणि विद्युतीकरणासाठी २००६-०७ मध्ये २.६० कोटी खर्च अपेक्षित होता. आता त्याच्या पूर्ततेसाठी तब्बल ४ कोटी ४९ कोटीच्या खर्च येणार असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या खर्चाला नुकतीच मान्यता देण्यात आली असून येत्या काही दिवसामध्ये त्याला सुरवात होणार आहे.
दहशतवादी हल्ल्यासाठी २६ डिसेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून समुद्रामार्गे मुंबईत आलेल्या १० अतिरेक्यांपैकी एकमेव अजमल कसाब जिवंतपणे सापडला होता.पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियापूर्ण होईपर्यंत कसाबच्या प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले होते. ऑर्थर रोड जेलमध्ये विशेष बराकी बनविण्यात आली होती.त्याचठिकाणी विशेष न्यायालय बनविण्यात आले होते. त्यासाठी कारागृहातील अन्य बांधकामासाठी ६ जुलै २००७ रोजी तत्कालिन सरकारने मंजुर केलेले २ कोटी ६२ लाख ७१ हजाराचा निधी वापरण्यात आला. त्यामुळे बराक क्रमांक -१मधील तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम व विद्युतीकरणाचे काम प्रलंबित राहिले. तेव्हाच्या दरपत्रकानुसार त्यासाठी २ कोटी ६० लाख खर्च अपेक्षित होता. मात्र गेल्या ११ वर्षामध्ये साहित्य व मजुरीच्या खर्चात दुपट्टीने वाढल्याने त्याचा फटका दुरुस्तीच्या कामावर बसला. गेल्यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यासाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार या कामासाठी ४४९ लाख ४० हजारची निविदा मान्य करण्यात आली. गेल्यावर्षी २० ऑगस्टला उच्च अधिकार समितीच्या बैठकीत बांधकामाला मंजुरी देण्यात आलेली आहे.
कसाबवरील सुरक्षा व्यवस्थेमुळे रखडले काम
राज्यातील सर्वाधिक महत्वाच्या कारागृहामधील ऑर्थर रोड जेल हे एक असून याठिकाणी टोळी युद्धातील अनेक कुख्यात गुंड आहेत.कच्च्या कैद्याप्रमाणे शिक्षा भोगणारे काही कैद्यांचाही समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. बॅराक क्रमांक-१मधील बांधकाम व विद्युतीकरण करण्याची आवश्यकता अनेक वर्षापासून प्रलंबित होते. कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी त्यासाठीची रक्कम खर्च करण्यात आल्याने निधीअभावी याकडे दुर्लक्ष झाले होते.
टप्याटप्याने होणार निधीची पुर्तता
ऑर्थर रोडमधील बराक क्रं.१च्या प्रलंबित बांधकामाचा खर्च १२ वर्षात २.६० कोटीपासून ते ४.५९ कोटीपर्यत पोहचले आहे. सरकारने त्याला मंजुरी दिली असलीतरी त्यासाठीचा निधी टप्याटप्याने पुर्तता केली जाईल. सरकारच्या गंगाजळीच्या तुटवड्याच्या फटका या कामावरही होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.