मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे पाण्याचे लोखंडी पाईप चोरणाऱ्या तिघा चोरट्याना काशीमीरा पोलिसांनीअटक केली आहे.
मीरारोडच्या हटकेश २२ क्रमांकाच्या बस स्थानक जवळ महानगरपालिकेचे जमिनी खालील जलवाहिनी अंथरण्याचे काम पाणीपुरवठा विभागा मार्फत सुरु आहे . मे. संदेश बुटाला ही ठेकेदार कंपनी करत आहे. हे मोठे अवजड पाईप चक्क हायड्रा क्रेनच्या सहाय्याने आयचर टेम्पोत भरून जितेंद्र घनश्याम गुप्ता (३०), रा. डी. एस. पटेल कंपाऊंड, वरसावे ; महेश पन्नालाल यादव (३३) रा. जयहिंद सोसायटी, साकीनाका व अब्दुल कलाम अबुहरेरा खान (२९) रा. दल्लू यादव चाळ, साकीनाका यांनी चोरून नेले होते . हे तिघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील आहेत.
या चोरी प्रकरणी ठेकेदाराने फिर्याद दिल्यावरून काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला . सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे, उपनिरीक्षक जावेद मुल्ला सह शिंदे, पाटील, मोहिले, तायडे, नलावडे, खोत, मोरे यांच्या पथकाने तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघा हि आरोपीना अटक केली.
पोलिसांनी चोरीस गेलेले २ लाख ६८ रुपये किमतीचे १०५० किलो लोखंडी पाईपसह गुन्ह्यात वापरलेली हायड्रा क्रेन व आयशर टेम्पो असा एकूण १२ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.